news
Home पुणे तळेगाव दाभाडे आगारात नव्या एसटी बसगाड्या! प्रवाशांना मिळणार अधिक चांगली सेवा!

तळेगाव दाभाडे आगारात नव्या एसटी बसगाड्या! प्रवाशांना मिळणार अधिक चांगली सेवा!

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण; मावळसाठी मंजूर १० पैकी पहिल्या ५ गाड्या दाखल!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तळेगाव दाभाडे (मॅक्स मंथन डेली न्यूज): मावळ तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! तळेगाव दाभाडे बस आगारात आज (१८ मे २०२५) आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे मावळमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे एसटी डेपोचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे, हरीश कोकरे, प्रकाश हगवणे, विशाल काळोखे, शैलेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी बसगाड्यांचे लोकार्पण केल्यानंतर आगारातील विविध विभागांची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मावळ तालुक्यासाठी नवीन बसगाड्यांची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन विभागाने मावळसाठी एकूण १० नवीन बसगाड्या मंजूर केल्या आहेत. आज पहिल्या टप्प्यातील ५ गाड्यांचे लोकार्पण झाले असून, उर्वरित गाड्या लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली.

लोकार्पणानंतर आमदार सुनील शेळके यांनी आगार व्यवस्थापक, चालक, वाहक आणि तिकीट निरीक्षकांशी संवाद साधला. त्यांनी आगाराच्या अडचणी, सेवेतील अडथळे आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. बससेवा अधिक प्रभावीपणे चालावी यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.

या नव्या बसगाड्यांमुळे तळेगाव, लोणावळा, पुणे, आंबेगाव आणि मुळशी परिसरातील प्रवाशांना नियमित आणि वेळेवर बससेवा उपलब्ध होणार आहे. तसेच, मावळ तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमधील दळणवळण अधिक सोपे होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आमदार सुनील शेळके आणि परिवहन विभागाचे आभार मानले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!