news
Home पिंपरी चिंचवड पुण्यात निसर्ग रक्षणाचा महायज्ञ! ‘वनमित्र’ अरुण पवार यांचा तळजाई टेकडीवर १० हजार वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक संकल्प

पुण्यात निसर्ग रक्षणाचा महायज्ञ! ‘वनमित्र’ अरुण पवार यांचा तळजाई टेकडीवर १० हजार वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक संकल्प

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पर्यावरणाचा महाजागर! तळजाई टेकडीवर १० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा ‘वनमित्र’ अरुण पवार यांचा महासंकल्प

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य आयोजन; वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी पुणेकरांची सामूहिक प्रतिज्ञा (७ जून २०२६)

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: “सध्याच्या काळात ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल आणि वाढते तापमान ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हे संकट रोखण्यासाठी केवळ कागदावर किंवा भाषणांमध्ये चर्चा करून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष मैदानावर उतरून कृतीशील होणे गरजेचे आहे. झाडे लावणे आणि ती जिवंत जगवणे हे आपल्या भावी पिढीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य बनले आहे,” असे आग्रही प्रतिपादन राज्यस्तरीय ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वनमित्र पुरस्कार’ प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले.

निमित्त होते, महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ’ पुणे विभागांतर्गत कामगार कल्याण भवन (सहकारनगर) यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिना’चे औचित्य साधून पुणे येथील प्रसिद्ध तळजाई टेकडीवर आयोजित केलेल्या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतः ज्येष्ठ वृक्षमित्र अरुण पवार यांनी भूषविले होते. या सुवर्ण सोहळ्याचे औचित्य साधून त्यांनी यावर्षी तब्बल १०,००० (दहा हजार) पर्यावरणपूरक वृक्षांची स्वतः लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा आणि वृक्ष दान करण्याचा ऐतिहासिक महासंकल्प जाहीर केला. तळजाई टेकडीच्या हिरवेगार परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून वृक्षारोपण केले.

याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य पाहुणे म्हणून संजय विद्वांस, पुणे शहर गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सन्माननीय सदस्य मुकुंद खटावकर, पुणे विभागाचे प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी उद्धव रामराजे, अधिक्षक संजय थोरात, सहाय्यक अधिक्षक सुधाकर पाटील, कनिष्ठ लिपिक तुषार रावळ आणि अरुण डोळे उपस्थित होते. तसेच हा भव्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण भवनाचे केंद्र संचालक सुहास माने, केंद्र महिला कल्याण सहायिका शोभा पोंगारे, केंद्र सेवक विकास पवार, रंजना बाठे आणि सुहास भोसले यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे नियोजन केले.

यावेळी बोलताना संजय विद्वांस आणि मुकुंद खटावकर यांनी वृक्षमित्र अरुण पवार यांच्या आजवरच्या निसर्ग संवर्धनाच्या अथांग प्रवासाचे आणि दहा हजार झाडे लावण्याच्या संकल्पाचे तोंडभरून कौतुक केले. कामगार कल्याण मंडळाने शासकीय पातळीवर असा सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तळजाई टेकडीवर विविध औषधी आणि सावली देणाऱ्या देशी प्रजातींच्या रोपांची मान्यवरांच्या हस्ते उत्साहात लागवड करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पुणेकर नागरिकांनी एकत्र येत “झाडे लावा.. झाडे जगवा..” आणि निसर्ग रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची सामूहिक शपथ घेऊन केली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!