news
पुण्यात निसर्ग रक्षणाचा महायज्ञ! ‘वनमित्र’ अरुण पवार यांचा तळजाई टेकडीवर १० हजार वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक संकल्पपिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे विराजमान; आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पदग्रहण सोहळासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड मनपा ‘ॲक्शन मोड’वर; ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भव्य कार्यशाळा!निवडणुकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या? ८० लाख महिलांना अपात्र केल्याने कष्टकरी संघर्ष महासंघाचे तहसील कचेरीवर ‘रुसवा आंदोलन’!पिंपळे सौदागरच्या काटे पेट्रोल पंप चौकात प्रवाशांचे अतोनात हाल; वाटसरू धुळीत
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे विराजमान; आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पदग्रहण सोहळा

पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे विराजमान; आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पदग्रहण सोहळा

"पंचसूत्रीच्या माध्यमातून हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार"; नव्या लोगो आणि वेबसाईटचे अनावरण, विविध पक्षांतील प्रमुख २० कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अडचणीच्या काळातही काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता सदैव जनतेच्या सोबत! – आमदार सतेज (बंटी) पाटील

पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा भव्य पदग्रहण सोहळा संपन्न; भाजपाच्या दिशाभूल करणाऱ्या राजकारणावर आणि मनपातील भ्रष्टाचारावर काँग्रेसचा एल्गार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा नेहमीच सर्वसामान्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. हाच विश्वास जनतेच्या मनात पुन्हा दृढ करून आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे. सध्याचे सत्ताधारी विकास डोळ्यापुढे न ठेवता केवळ लोकांची दिशाभूल करत निवडणुका लढवत आहेत. जरी सध्या पक्षासमोर काही अडचणी असल्या तरी रात्रीनंतर जसा पुन्हा देदीप्यमान सूर्य उगवतो, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी सज्ज होऊन पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचे गतवैभव आणि दहा-वीस वर्षांपूर्वीचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करावे,” असे आग्रही प्रतिपादन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा भव्य व ऐतिहासिक पदग्रहण सोहळा पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार सतेज पाटील बोलत होते. या सोहळ्याला लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे आणि काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे आगमन होताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बाबासाहेब भोसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मुख्य सभागृहात राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अनंतरावजी थोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सामर्थ्याचा प्रवास दर्शवणारे युवतींचे अत्यंत देखणे स्वागत नृत्य सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्यात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचा अधिकृत ध्वज नवनिर्वाचित शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्याकडे सोपवून त्यांच्याकडे पदभाराची सूत्रे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. पदभार स्वीकारताच पक्षाचा वारसा आणि विचार जिवंत ठेवणाऱ्या शहरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा बंटी पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचा नवीन अधिकृत लोगो, एस.आय.आर. (SIR) मतदार यादी पुनर्परीक्षण अभियानाचा माहिती मदत क्रमांक आणि पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सुवर्ण सोहळ्याचे औचित्य साधून विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख २० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब पाटील, सदाशिव तळेकर, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शिल्पा गायकवाड, प्रवीण कांबळे, जावेद इनामदार, महेंद्र सरोदे, अतुल शिंगाडे, मनोज गिल, बाबा बनसोडे, कमलेश जैन आणि गोरख खळगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या वाकड प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार स्वप्निल बनसोडे आणि निगडीमधून निवडणूक लढवलेल्या शिल्पा गायकवाड यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, “या पिंपरी-चिंचवड शहराची संपूर्ण जडणघडण आणि विकास हा काँग्रेस पक्षानेच केला आहे. मात्र, १९९९ नंतर वरिष्ठ नेते शहरात न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, सर्व वंचित, उपेक्षित आणि सामान्य नागरिकांना सोबत घेऊन आपण ‘सर्वांची काँग्रेस’ करून दाखवणार आहोत. आगामी काळात संघटन, प्रशिक्षण, प्रबोधन, आंदोलन आणि परिवर्तन या पंचसूत्रीच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अथांग भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडतानाच, जून ते ऑक्टोबर दरम्यान ‘मतदार यादी पुनर्परीक्षण अभियान’ मोठ्या प्रमाणावर राबवून बोगस मतदानाला आळा घालणार आहोत. तसेच अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हाणून पाडण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता मैदानात सज्ज असेल.”

आमदार सतेज पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर प्रखर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे फ्लोटिंग पापुलेशन असलेले आणि मोठे आर्थिक साम्राज्य असलेले प्रगत शहर आहे. मात्र, मनपा सत्तेतील लोकांनी या शहराचा कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने केला. सध्या राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे अथांग कर्ज असून, राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ६० ते ८० हजार रुपयांचे कर्ज वेगवेगळ्या मार्गाने लादण्यात आले आहे. हे सरकार केवळ स्वतःचा फायदा पाहत आहे, अजून तर यांचा आपापसातील भावकीचा वादही मिटलेला नाही. निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेतून ८० लाख पात्र महिलांची नावे कमी करणे हे भाजपचे मोठे अपयश आहे. योग्य पडताळणी न केल्यामुळे १४,००० पुरुषांना लाभ देऊन या सरकारने संपूर्ण राज्याची मान खाली घालवली आहे. अशा परिस्थितीत १८ ते ३० वयोगटातील तरुण पिढीला संविधानाची मूल्ये आणि महापुरुषांचा खरा इतिहास सांगण्याची गरज आहे; कारण भाजप खोटा इतिहास पसरवून युवकांची दिशाभूल करत आहे.”

विचारवंत आणि लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नरेंद्र बनसोडे यांच्यासारख्या अभ्यासू युवकाला संधी मिळणे आणि त्यांच्या पदग्रहणासाठी सतेज पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित राहणे ही अत्यंत आशादायी बाब आहे. केवळ मेट्रो आणणे किंवा ठराविक लोकांना कंत्राट देणे म्हणजे खरा विकास नव्हे, हे आता देशाला कळाले आहे. खरा सार्वजनिक विकास हा गोरगरिबांना मिळणारे शुद्ध पिण्याचे पाणी, सरकारी रुग्णालयात मिळणारे श्रीमंतांच्या तोडीचे उपचार आणि सरकारी शाळांमध्ये श्रीमंतांच्या मुलांनी शिक्षण घेण्यावर अवलंबून असतो. येत्या काळात तरुणांना संविधानाच्या मूल्यांवर उभा असलेला देश हवा आहे. नव्या पिढीला नदी सुधारणा, पाण्याचे नियोजन आणि विकासाचे शाश्वत प्रारूप हवे असून, या मुद्द्यांवर काँग्रेसने सिव्हिल सोसायटीला सोबत घेऊन नवे राजकारण करणे काळाची गरज आहे.” या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, हाजी जाकीर शेख, दाहर मुजावर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी महापौर कवीचंद भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहितुले, माजी नगरसेवक अत्तरभाई चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. जितेंद्र जैन, प्रा. बी. बी. शिंदे, गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश खंदारे, स्वप्निल बनसोडे, महादेव वाळुंजकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, प्रवीण कदम, वैभव जाधव आणि छावा संघटनेचे रावसाहेब गंगाधरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी हिराचंद जाधव, महेश नांद्रे, जितेंद्र छाबडा, विजय ओव्हाळ, हरीश डोळस, कुणाल भोसले, बाबा गॅसमुद्रे, उमेश बनसोडे आणि सदाशिव तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!