पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण उर्फ मनोज प्रधान, ६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या फायद्यासाठी कोणतीही जाचक अट न ठेवता राज्यातील कोट्यवधी महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ सरसकट देण्यात आला. मात्र, आता निवडणूक संपताच आणि शासनाला या योजनेचा प्रचंड आर्थिक भार पेलता येईनासा झाल्यामुळे विविध तांत्रिक कारणे पुढे करून अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या गरिबांच्या घरातील महिलांना अपात्र ठरविण्याचे भयंकर कारस्थान सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ज्या महिला कालपर्यंत ‘लाडक्या बहिणी’ होत्या, त्या आज सरकारला अचानक ‘परक्या’ का झाल्या?” असा जळजळीत सवाल करत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील तब्बल ८० लाखांहून अधिक पात्र, गरीब, कष्टकरी, विधवा, परित्यक्ता आणि असहाय्य सामान्य गृहिणींना विविध कागदपत्रांचे कारण देत अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ ‘कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र’च्या वतीने निगडी येथील तहसीलदार कार्यालयासमोर “लाडक्या बहिणींचे रुसवा आंदोलन” अत्यंत आक्रमकपणे छेडण्यात आले.या आंदोलनात शेकडो महिलांनी संतप्तपणे सहभागी होत राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला. “१५०० नको, २१०० द्या”, “अपात्र महिलांना तात्काळ पात्र करा”, “फसवू नका, फसवू नका, लाडक्या बहिणींना रुसवू नका!” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.

आंदोलकांचे नेतृत्व करणारे काशिनाथ नखाते म्हणाले, “निवडणुकीच्या रणधुमाळीत बहिणींना १५०० रुपयांऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याचे मोठे गाजावाजा करत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज दोन वर्षे उलटून गेली तरी हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. उलट हक्काचे मिळणारे १५०० रुपये देखील तांत्रिक अडचणींचे सोंग घेऊन बंद केले जात आहेत. काशिनाथ नखाते यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढताना काही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले, “२८ जून २०२४ रोजी अत्यंत गाजावाजा करत ही योजना सुरू झाली. सुरुवातीला तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ देण्यात आला. मात्र, यामध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चक्क १४ हजार पुरुषांच्या खात्यावर लाभाचे पैसे जमा झाले. पुरुषांना लाभ देण्यासाठी आणि मतांच्या नादात चुकीच्या लोकांना वाटप करण्यासाठी जनतेच्या रक्ताघामाचा तब्बल २४ हजार ३०० कोटी रुपयांचा पैसा पाण्यात घालवण्यात आला. या संपूर्ण योजनेत एकूण १७ हजार ५४० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोळ झाल्याचे समोर येत आहे. जर पुरुषांनी किंवा अपात्र लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला, तर त्याची शिक्षा आज कष्टकरी, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना का दिली जात आहे?”
अनेक महिलांनी आंदोलनादरम्यान प्रशासनावर गंभीर आरोप केले. केवायसी (KYC) प्रक्रियेदरम्यान सतत सर्व्हर डाऊन राहणे, मोबाईलवर ओटीपी (OTP) न मिळणे, बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे खाती गोठणे अशा विविध तांत्रिक अडचणी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात आहेत का? अशी शंका महिलांनी उपस्थित केली. या तांत्रिक त्रुटींमुळे लाखो कष्टकरी महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या असून, घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या आक्रमक रुसवा आंदोलनामध्ये कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासोबत अश्विनी मालुसरे, मुमताज शेख, सुनीता पोतदार, सुनंदा चिखले, ज्योती म्हस्के, शुभांगी भोसले, वर्षा नवसरे, मनीषा कोतवाल, कलावती, छाया मंगले, मनपा सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर, उपाध्यक्ष राजेश माने, नाना कसबे, सुनील भोसले, इरफान चौधरी आणि लाला राठोड यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील कष्टकरी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनाच्या शेवटी लाडक्या बहिणींच्या आणि कष्टकरी महासंघाच्या एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार डॉ. मनिषा माने – लोंढे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. “शहरातील आणि राज्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये. शासनाने तात्काळ विशेष मोहीम राबवून सर्व अपात्र ठरवलेल्या गरीब भगिनींना न्याय द्यावा, अन्यथा राज्यातील लाखो कष्टकरी महिलांना घेऊन थेट मुंबईतील मंत्रालयावर अधिक तीव्र आणि उग्र मोर्चा काढण्यात येईल,” असा गर्भित इशारा काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

