news
Home पिंपरी चिंचवड मोशी हत्याकांडावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय एल्गार; पोलीस आयुक्तांना दिले तीव्र निदर्शनांचे निवेदन

मोशी हत्याकांडावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय एल्गार; पोलीस आयुक्तांना दिले तीव्र निदर्शनांचे निवेदन

मानव कांबळे, मारुती भापकर, नरेंद्र बनसोडे, सचिन चिखले यांच्यासह प्रमुखांचा महापालिका प्रशासनाला थेट इशारे | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी कचरा डेपो दुर्घटना: ९ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर अन् ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी येथील कचरा डेपोत कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळून ९ निष्पाप कामगारांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ अपघात नसून महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या बेजबाबदारपणा व निष्काळजीपणामुळे झालेला ‘हत्याकांड’ आहे! असा घणाघाती आरोप करत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय नेते, राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुखांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध थेट एल्गार पुकारला आहे.

या भयानक दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpable Homicide) दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना जाहीर निवेदन दिले आहे.

दिनांक ८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपोमध्ये नियमबाह्य आणि अवाजवी पद्धतीने कचऱ्याचे महाकाय ढीग साचवण्यात आले होते. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे आणि कर्तव्यात भीषण कसूर केल्यामुळे कचऱ्याचा भलामोठा ढीग शेजारील इमारतीवर कोसळला. या कचऱ्याच्या व इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दाबले जाऊन कर्तव्यावर असलेल्या ९ निष्पाप सफाई कामगारांचा जागीच गुदमरून व चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, या मृत्यूस केवळ आणि केवळ महापालिकेचे संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठाम आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की, कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी जबाबदार घटकांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. संजय कुलकर्णी (पर्यावरण विभाग, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका), योगेश आल्हाट (पर्यावरण विभाग अधिकारी), बांधकाम परवाना व अतिक्रमण विभागाचे संबंधित अधिकारी, अँथनी लारा (Anthony Lara) कचरा ठेकेदार कंपनीचे सर्व मुख्य अधिकारी व संचालक दुर्घटनास्थळाशी संबंधित इतर सर्व जबाबदार घटक व अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत.

बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम जर पोलीस आणि पालिका प्रशासनाने केले, तर शहरात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गरिबांच्या आणि कामगारांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर व कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.

या ऐतिहासिक सर्वपक्षीय आंदोलनात आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मानव कांबळे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), नरेंद्र बनसोडे (शहराध्यक्ष, काँग्रेस), चेतन पवार (शहर प्रमुख, शिवसेना), सचिन चिखले (शहर प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विकी पासोटे (युवक अध्यक्ष, आम आदमी पार्टी), प्रकाश जाधव (कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ), प्रवीण कदम (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा), सतीश काळे (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), धनाजी येळकर पाटील (अध्यक्ष, छावा मराठा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य) सर्वपक्षीय नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन आणि महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आता पोलीस आयुक्त यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!