‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम शाळा, भोसरी येथे ‘आसरा सोशल फाउंडेशन, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा शाळा’ (Zero Waste School) या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे यांनी विशेष भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याशी संवाद साधला आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला.
भेटदरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण, कचऱ्याचा पुनर्वापर (Reuse), पुनर्निर्मिती (Recycle) आणि दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर चर्चा केली. शून्य कचऱ्याची संकल्पना केवळ पुस्तकात न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर रवि लांडगे म्हणाले,
“स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. या बदलाची सुरुवात जर आपल्या शाळांमधून आणि विद्यार्थ्यांपासून झाली, तर भविष्यात पर्यावरणाबाबत अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतील. शाळांमध्ये राबवले जाणारे असे उपक्रम स्वच्छतेची सवय, कचरा व्यवस्थापनाची जाणीव आणि निसर्ग संरक्षणाची भावना अधिक दृढ करतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात आणि परिसरातही ‘शून्य कचरा’ संकल्पनेचा संदेश पोहोचवून यात योगदान द्यावे.”
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती महापौरांना दिली. ओला व सुका कचरा वेगळा करणे, कंपोस्टिंग आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि त्यांच्या उत्साहाचे महापौरांनी मनःपूर्वक कौतुक केले.
या कार्यक्रमास आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या प्रतिनिधी अर्चना मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता डिसुजा, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

