news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोशी ग्रामस्थांची उच्चस्तरीय बैठक संपन्न; कचरा डेपोच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडग्याचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोशी ग्रामस्थांची उच्चस्तरीय बैठक संपन्न; कचरा डेपोच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडग्याचे आश्वासन

महापौर रवि लांडगे अन् आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आक्रमक; मोशीच्या नागरी सुविधांसाठी तातडीने उपाययोजनांचे निर्देश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी दुर्घटनाग्रस्तांना न्याय अन् प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले,२० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी (Waste-to-Energy) प्रकल्प परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये पसरलेली अस्वस्थता, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकाराने आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोशी ग्रामस्थांची ही उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देणे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि मोशीतील कचरा डेपो व नागरिकांच्या आरोग्य-पर्यावरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन ठोस आश्वासने देण्यात आली.

बैठकीदरम्यान मोशी ग्रामस्थांनी दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर पाढा वाचत आपल्या तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या. ही घटना केवळ एका अपघातापुरती मर्यादित नसून नागरिकांचा जीव, आरोग्य, पर्यावरण आणि प्रशासनावरील विश्वासाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले.

बैठकीत ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या  वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कंत्राटदार कंपनी व यंत्रणांवर कठोर कायदेशीर कारवाई (FIR व फौजदारी गुन्हे) करण्यात यावी. मृत नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने भरीव आर्थिक मदत वितरित करावी आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिका व शासनाने करावा. पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास महापालिका किंवा शासकीय सेवेत नोकरी उपलब्ध करून देण्यात यावी. मोशी कचरा डेपोमुळे होणाऱ्या दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याच्या दुष्परिणामांवर कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. परिसरात आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना राबवून प्रलंबित नागरी सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या. दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात प्रशासन कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी उपस्थित विभागप्रमुखांना तातडीने आवश्यक कारवाईचे निर्देश दिले. ग्रामस्थांनी मांडलेले सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने आणि टप्प्याटप्प्याने सोडवले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे भावूक झाले. ते म्हणाले,

“मोशीतील प्रत्येक नागरिकाची वेदना मी स्वतः जवळून अनुभवली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळवून देणे, दोषींवर कडक कारवाई करणे आणि मोशीकरांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणे, ही माझी नैतिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्राथमिक जबाबदारी आहे. मोशीकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील.”

या बैठकीला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसदस्या सारिका गायकवाड, सारिका बोऱ्हाडे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसदस्य धनंजय आल्हाट, मंदा आल्हाट, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, उदय गायकवाड, निलेश बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे आणि मोशीतील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पूर्ण ताकदीने ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहतील, असा पुनर्उच्चार या बैठकीअंती करण्यात आला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!