लिंगभाव आणि स्त्री अभ्यास : समताधिष्ठित, संविधाननिष्ठ आणि मानवतावादी भारत घडविण्याचा प्रभावी मार्ग
अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन १९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: ”मी समाजाची प्रगती स्त्रियांनी मिळविलेल्या प्रगतीच्या प्रमाणावर मोजतो.” या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला प्रमाण मानून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही समाजातील स्त्री-पुरुष असमानता, कौटुंबिक हिंसा, बालविवाह, हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या आणि पारलिंगी व्यक्तींविरुद्ध होणारा भेदभाव यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी ‘लिंगभाव व स्त्री अभ्यास’ (Gender & Women’s Studies) हा अभ्यासक्रम सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन ठरत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (महा. अंनिस) अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची हमी दिली आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी शिक्षण, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून ज्या न्याय्य समाजरचनेचे स्वप्न मांडले, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरत आहे.
आपला शैक्षणिक व सामाजिक अनुभव मांडताना प्रफुल्ल श्रीधर म्हणाले, “मी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून एम.ए. स्त्री व लिंगभाव अभ्यास पूर्ण केला. सामाजिक कार्य करताना अनेक प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव येत होता; परंतु या अभ्यासक्रमामुळे त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची, त्यांचे शास्त्रीय विश्लेषण करण्याची आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उपाय शोधण्याची एक नवी डोळस दृष्टी मला मिळाली. त्यामुळे हा अभ्यासक्रम माझ्यासाठी केवळ एक शैक्षणिक पदवी नसून सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम करणारा जीवनानुभव ठरला आहे.”
हा अभ्यासक्रम केवळ महिलांच्या प्रश्नांपुरता मर्यादित नाही. स्त्री, पुरुष आणि सर्व लिंग-ओळख (Gender Identity) असलेल्या व्यक्तींना समाजात समान सन्मान, समान संधी आणि न्याय मिळावा, यासाठी समाजव्यवस्थेचे आंतरविद्याशाखीय विश्लेषण करणारी ही एक प्रगत ज्ञानशाखा आहे. समाजातील सत्ता-संबंध, संस्कृती, शिक्षण, धर्म, अर्थकारण, माध्यमे, कायदे आणि सार्वजनिक धोरणांचा लिंगभावाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जातो.
या अभ्यासक्रमात पितृसत्ता, स्त्रीवाद, पुरुषत्व, मानवी हक्क, भारतीय राज्यघटना, संशोधन पद्धती, महिला सक्षमीकरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सखोल अभ्यास केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, संवेदनशीलता, संवादकौशल्य आणि लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी विकसित होते.
बदलत्या काळात या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वेगाने वाढत असून विविध पदांवर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. Gender Expert, Gender Trainer, Research Associate, Programme Officer, Social Development Consultant. महिला व बालविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR), स्वयंसेवी संस्था (NGOs), समुपदेशन केंद्र, महिला आयोग, बालहक्क आयोग, संशोधन संस्था आणि विद्यापीठे.
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी प्रफुल्ल श्रीधर यांनी शासनासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. १. महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि महिला आयोगातील संबंधित शासकीय पदांवर ‘लिंगभाव व स्त्री अभ्यास’ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. २.केंद्र व राज्य सरकारच्या ‘मिशन शक्ती’, सखी केंद्रे, वन स्टॉप सेंटर, समुपदेशन सेवा आणि लिंगसमता प्रकल्पांमध्ये या अभ्यासक्रमाच्या पदवीधरांसाठी स्वतंत्र पदांची निर्मिती करावी. ३. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये या विषयाविषयी करिअर मार्गदर्शन व व्यापक जनजागृती अभियान राबवावे. ४. शासकीय व निमशासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये (उदा. यशदा) लिंगसंवेदनशीलता प्रशिक्षणासाठी या विषयातील तज्ज्ञांचा समावेश करावा. ५. महिला सक्षमीकरणाशी संबंधित शासकीय धोरणे, संशोधन आणि प्रकल्पांमध्ये या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.
“समताधिष्ठित समाज केवळ कायद्याने निर्माण होत नाही; तो शिक्षण, संवेदनशीलता आणि विवेकपूर्ण विचारातून घडतो. त्यामुळे महाराष्ट्र शासन, विद्यापीठे, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी या अभ्यासक्रमाचा व्यापक प्रचार-प्रसार करावा, ही काळाची गरज आहे,” असे आवाहन प्रफुल्ल मंदा श्रीधर (संपर्क: ९६६५१८५४२८) यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
