बापाच्या खुनाचा तब्बल २३ वर्षांनी घेतला बदला! ६ महिन्यांचा बाळ मोठा झाला अन् बापाच्या मारेकऱ्याचा गेम वाजवला; पुणे ग्रामीण पोलिसांकडून थरारक कटाचा पर्दाफाश
पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: चित्रपटालाही शोभेल असा सूडाचा एक थरारक आणि धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात समोर आला आहे. अवघ्या ६ महिन्यांचा असताना डोक्यावरून बापाचे छत्र हरवलेल्या एका २४ वर्षीय तरुणाने तब्बल २३ वर्षांनंतर वडिलांच्या खुनाचा बदला घेतला आहे. बापाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेऊन तरुणाने अत्यंत क्रूरपणे त्याचा गेम वाजवला. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत २४ वर्षीय तरुणासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) या व्यक्तीचा अत्यंत निर्घृणपणे खून केलेला मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी मंथन वैद्य (वय २४) आणि सौरभ परदेशी या दोन संशयितांची नावे निष्पन्न केली.
पोलिसांनी १४ जुलै रोजी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर दोन साथीदारांच्या (मिझान शेख आणि संदीप कोरी) मदतीने संजय कडू-देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.
या हत्येमागचा इतिहास तपासताना पोलिसांनाही धक्का बसला. २००३ मध्ये (तब्बल २३ वर्षांपूर्वी) मृत संजय कडू-देशमुख याने मंथन याचे वडील दिनेश वैद्य यांची एका किरकोळ वादातून हत्या केली होती. ज्यावेळी दिनेश वैद्य यांचा खून झाला, त्यावेळी मंथन हा अवघ्या ६ महिन्यांचा बाळ होता.
मोठा होत असताना आपल्या बापाची हत्या कडू-देशमुख यानेच केली असल्याचे मंथनला समजले. तेव्हापासूनच त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली होती. कडू-देशमुख हा एका दुसऱ्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. हीच संधी साधून मंथनने त्याच्या हत्येचा कट रचला आणि साथीदारांच्या मदतीने बापाच्या मारेकऱ्याचा काटा काढला, असे सहायक पोलीस निरीक्षक चेतन माचले यांनी सांगितले.
राजगड पोलिसांनी मंथन वैद्य, सौरभ परदेशी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
