जंजीरा किल्ल्यावर सरकारने भगवा झेंडा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन; ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’चा इशारा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: ऐतिहासिक जंजीरा किल्ल्यावर सरकारने सन्मानाने भगवा झेंडा फडकवावा, अन्यथा पुढील तीन महिन्यांत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी दिला आहे. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. श्रमिक गोजमगुंडे म्हणाले की, जंजीरा किल्ल्यावर फडकवल्या जाणाऱ्या भगव्या झेंड्याचे कायम रक्षण आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान घेण्यास तयार आहे. यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत अधिकृत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तसेच, मंत्री निलेश राणे यांच्याकडेही संस्थेने महत्त्वाची मागणी केली आहे. जंजिऱ्याप्रमाणेच ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांच्या जाण्या-येण्यासाठी सरकारने जेट्टी (Jetty) बांधावी. यामुळे दळणवळण सोपे होऊन पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे गोजमगुंडे यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कुणाल साठे यांनी सांगितले की, २०१६ मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील ३०० किल्ल्यांवर एकाच वेळी भगवा झेंडा फडकवण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी जंजीरा किल्ल्यावर स्थानिक अल्पसंख्यांक समाजाने विरोध केला होता. तेव्हापासून संस्था सतत पत्रव्यवहार करत आहे.
“आगामी तीन महिन्यांत सरकारने जंजिऱ्यावर सन्मानाने भगवा झेंडा न लावल्यास, राज्यभरातील हजारो दुर्गप्रेमी एकत्र येऊन तेथे भगवा फडकवतील. संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मागणीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे.”
— कुणाल साठे (पुणे जिल्हा अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान)
या पत्रकार परिषदेला सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे राज्य संपर्क प्रमुख गौरव शेवाळे, गणेश राजपूत यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

