१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे; नियम मोडल्यास घंटागाडी कचरा उचलणार नाही!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी १५ ऑगस्ट २०२६ पासून शहरात घनकचरा व्यवस्थापन नियमांची अतिशय कठोर अंममलबजावणी केली जाणार आहे. यानुसार, कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत कचरा स्वीकारला जाणार नाही, असा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे १. ओला कचरा (Kitchen waste/Food waste), २. सुका कचरा (Dry waste – plastic, paper, etc.), ३. सॅनिटरी कचरा (Sanitary waste), ४. विशेष काळजीयोग्य कचरा (Hazardous/Domestic Hazardous waste) या चार प्रकारांत वर्गीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था (Housing Societies), हॉटेल्स, रुग्णालये आणि व्यावसायिक संकुलांसाठी स्वतंत्र जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १५ ऑगस्टनंतर अशा आस्थापनांचा कचरा महापालिका उचलणार नाही. त्यांना त्यांच्याच परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक असणार आहे.
तसेच, शहरातील कचऱ्याची वाहतूक कमी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ‘विकेंद्रित कचरा प्रक्रिया केंद्रे’ (Decentralized Waste Processing Plants) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा विलगीकरण हा केवळ नियम नसून शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचरा वेगळा करण्याची सवय अंगीकारावी.” – महापौर रवि लांडगे
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या नियमांची १५ ऑगस्टपासून कठोर अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारल्याशिवाय प्रभावी घनकचरा व्यवस्थापन शक्य नाही.” – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
“मोठ्या आस्थापनांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेकडून कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.”- अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम
“कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास लँडफिलवर (मोशी डेपो) जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टची वाट न पाहता आजपासूनच कचरा वर्गीकरणाची सवय लावावी.” – उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
