पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण उर्फ मनोज प्रधान ६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपळे सौदागर: “पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथील काटे पेट्रोल पंप चौकात सध्या अत्यंत विचित्र आणि संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेल्या बाकड्यांचा ताबा बेजबाबदार रिक्षाचालकांनी घेतला असून, वृद्ध, महिला व चिमुकल्या वाटसरूंना मात्र धुळीने माखलेल्या पदपथावर बसण्याची वेळ आली आहे. तसेच, स्वतःची प्रसिद्धी करणाऱ्या शेकडो स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांच्या गर्दीत एकालाही या चौकात साधी पाणपोई सुरू करावी असे वाटत नाही, हे दुर्दैव आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी येथील दुरावस्थेचे वाभाडे काढले आहेत.
या गंभीर समस्येबाबत प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रदीप गायकवाड यांनी थेट प्रशासनाला जागे करत स्थानिक नगरसेवकांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. काटे पेट्रोल पंप चौक हा पिंपळे सौदागरमधील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक मानला जातो. येथे हिंजवडी आयटी पार्क, वाकड, पुनावळे व ताथवडेकडे जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी, नोकरदार आणि महिला बस किंवा खाजगी वाहनांची वाट पाहत उभे असतात. अनेक प्रवासी रिक्षाची अपेक्षित संख्या पूर्ण होईपर्यंत चौकात थांबून राहतात.
या प्रवाशांना आणि पायी चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना क्षणभर विश्रांती मिळावी, म्हणून एका दानशूर सामाजिक कार्यकर्त्याच्या संकल्पनेतून येथे प्रवाशांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे बसवले आहेत. मात्र, सध्या येथे उलटीच गंगा वाहताना दिसत आहे. ज्या प्रवाशांसाठी हे बाकडे बसवले आहेत, ते बिचारे पदपथावरील धूळ आणि मातीमध्ये उभे राहतात किंवा खाली जमिनीवर बसतात; तर दुसरीकडे स्थानिक रिक्षाचालक आपापल्या रिक्षा बाजूला लावून, त्या बाकड्यांवर बिनधास्तपणे आडवे होऊन गप्पा मारत बसलेले असतात. रिक्षाचालकांच्या या दादागिरीमुळे सुजाण नागरिकांना आणि महिलांना तिथे बसण्याची हिंमत देखील होत नाही. पिंपळे सौदागर परिसरात स्वतःच्या नावाचे मोठे फ्लेक्स लावून ‘समाजसेवक’ म्हणून मिरवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, या प्रचंड गर्दीत एकाही तथाकथित कार्यकर्त्याला काटे पेट्रोल पंप चौकात वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी असे वाटलेले नाही. उन्हातान्हात तासनतास बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना साधे पिण्याचे पाणी विकत घेण्यासाठी दूरवर जावे लागते. या चौकात तात्काळ स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
या भीषण पाणीटंचाईवर अत्यंत व्यावहारिक आणि आधुनिक तोडगा काढण्यासाठी प्रदीप गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील मुख्य चौक, तसेच हिंजवडी, पुनावळे आणि ताथवडे येथील काही जागृत कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात अत्याधुनिक ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ बसवले आहे. या मशीनमध्ये नागरिकांनी एक रुपयाचा कॉइन (नाणे) टाकला की त्यांना एक लीटर स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळते. याच धर्तीवर काटे पेट्रोल पंप चौकातही तातडीने असे आधुनिक वॉटर मशीन बसवणे अत्यंत आवश्यक आहे.” या संदर्भात नागरिकांच्या वतीने आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या वतीने पिंपरी-चिंचवड मनपाचे कार्यक्षम आणि विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे यांच्याकडे लवकरच अधिकृत भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येईल, अशी ग्वाही प्रदीप गायकवाड यांनी शहरवासीयांना दिली आहे.
या गंभीर नागरी प्रश्नावर महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तात्काळ काय पाऊल उचलतात आणि प्रवाशांची या त्रासातून कधी सुटका होते, याकडे आता पिंपळे सौदागरमधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
