चुकीचे निदान अन् निष्काळजी उपचार; ‘व्हायटल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’विरोधात गंभीर तक्रार, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
आर्थिक फायद्यासाठी रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा थेट आरोप; वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि जनहिताची असल्याचा दावा वारंवार केला जात आहे. मात्र, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील काही खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली केवळ आर्थिक फायद्यासाठी गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा केला जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. पिंपरी येथील नामांकित ‘व्हायटल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ (Vital Multispeciality Hospital) विरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश प्रकाश नलावाडे यांनी थेट शासनाच्या विविध सर्वोच्च विभागांकडे पुराव्यांसह गंभीर तक्रार दाखल केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हॉस्पिटलने चुकीचे निदान करून, आवश्यक वैद्यकीय काळजी न घेता रुग्णाच्या जीवाशी खेळ केला असून संबंधित डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते निलेश नलावाडे यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीनुसार, त्यांची आई अत्यंत आजारी असल्याने त्यांना दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सतत ताप, थंडी, उलटी आणि लूज मोशन (अतिसार) चा त्रास होत असल्यामुळे व्हायटल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत तातडीने भरती करून घेतले.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटात ७.३ एमएमचा (MM) मोठा खडा (किडनी स्टोन) असल्याचे सांगून तातडीने शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नलावाडे यांनी तात्काळ लाखो रुपये खर्च करून हे ऑपरेशन करून घेतले.तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, अत्यंत महागडी शस्त्रक्रिया करूनही रुग्णाच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट रुग्णाचा ताप, थंडी, सतत होणाऱ्या उलट्या आणि असह्य वेदना तशाच कायम राहिल्या. हॉस्पिटल प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला.
त्यानंतर नलावाडे यांनी आपल्या आईला दुसऱ्या नामांकित रुग्णालयात नेऊन तिथे सर्व वैद्यकीय तपासण्या आणि स्कॅनिंग पुन्हा केले. या दुसऱ्या तपासणीचा अहवाल अत्यंत धक्कादायक आला. त्यामध्ये रुग्णाच्या डाव्या किडनीमध्ये अजूनही अनेक स्टोन (खडे) असल्याचे, तसेच किडनीला गंभीर संसर्ग (Infection), हायड्रोनेफ्रोसिस, मूत्राशयाचा तीव्र दाह (Urinary Bladder Inflammation) आणि यकृत (Liver) व प्लीहा (Spleen) वाढल्याचे गंभीर निदान स्पष्ट झाले.
यावरून व्हायटल हॉस्पिटलने आधी चुकीचे निदान केले किंवा शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत गंभीर निष्काळजीपणा करून रुग्णाला अर्धवट स्थितीत सोडले, असा दावा नलावाडे यांनी केला आहे.केवळ आर्थिक लूट करण्याच्या उद्देशाने एका ज्येष्ठ महिला रुग्णाच्या आरोग्याशी आणि जीवनाशी खेळ करणाऱ्या व्हायटल हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांवर आणि व्यवस्थापनावर कडक कलमांखाली फौजदारी गुन्हा (Criminal Case) दाखल करावा, अशी मागणी निलेश नलावाडे यांनी केली आहे. तसेच संबंधित दोषी डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना (Medical License) कायमचा रद्द करण्यात यावा; रुग्णाचे संपूर्ण केस पेपर्स, ऑपरेशन थिएट रिपोर्ट, स्कॅन रिपोर्ट्स आणि बिलांची उच्चस्तरीय वैद्यकीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नलावाडे यांनी या प्रकरणाची लेखी तक्रार राज्याचे आरोग्य विभाग सचिव, जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), ग्राहक संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) यांच्याकडे अधिकृतपणे पाठवली आहे.
दरम्यान, या खळबळजनक प्रकरणाबाबत संबंधित व्हायटल मल्टिस्पेशालिटी रुग्णालय किंवा तिथल्या डॉक्टरांची अधिकृत बाजू अद्याप प्रसारमाध्यमांसमोर आलेली नाही. प्रशासकीय आणि वैद्यकीय चौकशीअंतीच या प्रकरणातील अंतिम सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणार असली, तरी या तक्रारीमुळे शहरातील खाजगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
