स्मार्ट सिटी पिंपळे सौदागरमध्ये ‘टेस्ट ऑफ इंदोर’च्या अनधिकृत कारखान्याला भीषण आग; ९ गॅस सिलिंडर अन् ३०० लीटर डिझेलमुळे मोठी दुर्घटना टळली!
फायर ऑडिट न करता रहिवासी भागात सुरक्षेचे नियम धाब्यावर; महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी मनोज प्रधान, २८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपळे सौदागर: पिंपरी-चिंचवडमधील सर्वात उच्चभ्रू आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर भागात आज एक अत्यंत धक्कादायक व थरारक घटना घडली. येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रस्त्यावरील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ शेजारी असलेल्या ‘टेस्ट ऑफ इंदोर’ (Taste of Indore) या खाद्यपदार्थांच्या अनधिकृत कारखान्याला अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच अत्यंत रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी पळापळ झाली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीने महापालिका प्रशासन आणि हॉटेल व्यावसायिकांच्या सुरक्षेचे वाभाडे काढले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा कारखाना द्वारकाधीश रो-हाउस या अत्यंत वर्दळीच्या आणि मुख्य रस्त्यावरील रहिवासी इमारतीत चालवला जात होता. रो-हाउसच्या कार पार्किंगच्या अधिकृत जागेवर अनधिकृतपणे पत्र्याचे शेड आणि भिंतीचे बांधकाम करून हा कारखाना उभा करण्यात आला होता. या ठिकाणी ‘टेस्ट ऑफ इंदोर’ या ब्रँडचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी बेकायदेशीरपणे मोठ्या डिझेल भट्ट्यांचा वापर केला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे, आग लागली त्या जागेवर तब्बल २०० ते ३०० लीटर डिझेलचा साठा साठवून ठेवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.आग लागल्यानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या कारवाईदरम्यान एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक बाब समोर आली. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये भीषण आग लागली होती, तिथून अग्निशमन दलाने तब्बल ९ ते १० गॅस सिलिंडर्स सुरक्षितपणे बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या मते, जर आगीच्या ज्वाळा या सिलिंडर्सपर्यंत पोहोचून त्यांचा स्फोट झाला असता, तर शेजारील बँका, दुकाने आणि गृहनिर्माण सोसायट्या पत्त्यांसारख्या कोसळल्या असत्या आणि शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव गेला असता. सध्या सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर मिळवताना अडचणी येत असताना, अशा व्यावसायिक ठिकाणी सिलिंडर्सचा इतका मोठा अवैध साठा येतो कुठून? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या भागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. द्वारकाधीश सोसायटीच्या नागरिकांनी या अनधिकृत कारखान्याबाबत आणि तिथल्या सुरक्षेच्या धोक्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे हेतुपरस्पर डोळेझाक केली. महापालिकेच्या याच अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि आशिर्वादामुळे रहिवासी भागात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा मृत्यूचा सापळा धडाक्याने चालवला जात होता, असा थेट आरोप रहिवाशांनी केला आहे. पिंपळे सौदागर हा परिसर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केला जात असताना, मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारे राजरोसपणे अनधिकृत हॉटेल्स, पत्राशेड आणि बेसमेंटमध्ये कारखाने सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या भागातील शेकडो हॉटेल्स आणि मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचे दरवर्षी कायद्यानुसार ‘फायर ऑडिट’ (Fire Audit) करणे गरजेचे आहे, परंतु महापालिका प्रशासनाकडून कोणतीही सक्ती किंवा तपासणी केली जात नाही.

या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करून, रहिवासी भागात अनधिकृत कारखाना चालवणाऱ्या ‘टेस्ट ऑफ इंदोर’च्या मालकांवर आणि अधिकृत पार्किंगची जागा अनधिकृत कारखाना तयार करण्यासाठी देणाऱ्या मालकांवर याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी महापालिका अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच भविष्यात अशा भयानक दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने पिंपळे सौदागर परिसरातील सर्व अनधिकृत हॉटेल्स आणि गॅस साठ्यांवर कडक चपराक बसवणारी धडक मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
