news
‘फुटपाथ कनेक्टिव्हिटी आणि व्हिजिबल क्लीनलिनेसवर विशेष भर द्या’; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!‘महापालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे’; महापौर रवि लांडगे यांचा प्रशासनाला स्पष्ट इशारा!‘रंगमंचाच्या माध्यमातून कलेची नाळ जपली जाते, महापालिकेची साथ कौतुकास्पद’; समर नखाते यांचे मनोगत!‘न्यायालयीन परिसरातील गोळीबाराच्या प्रयत्नाने पुण्यात खळबळ; घटनास्थळावरून दोन पिस्तुले व मॅगझिन जप्त’!‘संविधानाचा करू सन्मान, पिंपरी-चिंचवड शहर माझा अभिमान’; महापालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे भव्य दौडीचे आयोजन!
Home पुणे ‘न्यायालयीन परिसरातील गोळीबाराच्या प्रयत्नाने पुण्यात खळबळ; घटनास्थळावरून दोन पिस्तुले व मॅगझिन जप्त’!

‘न्यायालयीन परिसरातील गोळीबाराच्या प्रयत्नाने पुण्यात खळबळ; घटनास्थळावरून दोन पिस्तुले व मॅगझिन जप्त’!

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह गुन्हे शाखा व न्यायवैद्यक पथकाची घटनास्थळी धाव; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक ४ बाहेर थरार; गोळीबाराच्या प्रयत्नानंतर कोयत्याने सपासप वार, ‘शुभम चव्हाण’ हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे गंभीर जखमी!

पुणे / पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय (सिव्हिल कोर्ट) परिसरातील गेट क्रमांक ४ बाहेर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) भरदुपारी गोळीबाराचा प्रयत्न आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली. या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. कात्रज) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदार किवळे हा बहुचर्चित शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असून, चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.

पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळील चेंबर क्रमांक ६३ बाहेर (कौटुंबिक न्यायालयासमोर) घडला. न्यायालयीन कामकाजासाठी मंदार किवळे परिसरात आला असता, दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला गाठले. हल्लेखोरांनी प्रथम मंदारवर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी ‘मिसफायर’ झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी हातातील धारदार कोयत्यांनी मंदारवर सपासप वार केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने हात पुढे केले असता, कोयत्याच्या तीव्र वारांमुळे त्याच्या हातांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.  हल्ला केल्यानंतर परिसरात दहशत माजवत आरोपी दुचाकींवरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा, स्थानिक शिवाजीनगर पोलीस आणि न्यायवैद्यक (Forensic) पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, तेथून दोन पिस्तुले आणि एक मॅगझिन जप्त केले आहे. गोळीबार प्रत्यक्ष झाला की केवळ प्रयत्न झाला, याची पडताळणी न्यायवैद्यक पथकाकडून केली जात आहे. २० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जागेच्या व आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाची हत्या झाली होती. या गुन्ह्यात मंदार किवळे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल होता. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटल्यानंतर जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!