पिंपळे सौदागरच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र; रस्ते व वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर ‘ऑन-स्पॉट’ पाहणी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपळे सौदागर: पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेले रस्ते, वाढती वाहतूक कोंडी, बंद पथदिवे आणि अतिक्रमणाच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे, नगरसेवक जयनाथशेठ काटे आणि महापालिकेचे नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी, रात्रीच्या वेळेची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हा ‘ऑन-स्पॉट’ दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यादरम्यान विविध नागरी समस्यांवर सखोल चर्चा होऊन तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रोड या प्रस्तावित डी.पी. रोडच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय पावले उचलण्याचे निश्चित झाले. मिलिटरी हद्दीलगत नव्याने सुरू झालेल्या रस्त्याच्या कडेला असलेले बंद विद्युत पथदिवे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. कुणाल आयकॉन रोडवर फेरीवाले, अनधिकृत दुकाने आणि अतिक्रमणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेण्यात आली. यावर त्वरित कारवाई करण्यासाठी शत्रुघ्न काटे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून धडक मोहीम राबवण्याचा आग्रह धरला. पादचाऱ्यांच्या हक्काच्या पदपथांवर वारंवार होणारे अतिक्रमण कायमस्वरूपी रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य कुंपण (फेंसिंग) किंवा सुरक्षा कठडे बसवण्याची शक्यता पडताळून कार्यवाही करण्याचे ठरले. द्वारका हाइट्सजवळील आर्मी बॅकसाईड रोडवरील सुमारे ३० ते ४० मीटरचा रखडलेला व अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
“पिंपळे सौदागरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, कुणाल आयकॉन रोडवरील अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी फोडणे, पदपथांचे रक्षण आणि मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे तात्काळ सुरू करणे या महत्त्वाच्या विषयांवर आज प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी करून ठोस निर्णय घेतले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून ही सर्व कामे युद्धपातळीवर मार्गी लावून नागरिकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.” — शत्रुघ्न (बापू) काटे (शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड)
या पाहणी दौऱ्यात नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनीही सर्व तांत्रिक बाबी तपासून या कामांना गती देण्याची सकारात्मक ग्वाही दिली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या संयुक्त पुढाकारामुळे पिंपळे सौदागरमधील रस्ते, प्रकाशयोजना आणि वाहतुकीचे प्रश्न लवकरच सुटतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


