‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: भारतीय संस्कृती, परंपरा आणि प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांचे दर्शन घडविणाऱ्या ‘श्री रामराज्य’ या भव्य नृत्यनाटिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. नृत्यकला मंदिर, पुणे निर्मित या नृत्यनाटिकेत पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील २० कलाकारांनी सहभाग घेत आपल्या नृत्यकलेच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक परंपरा जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे सादर केली.
‘असत्यावर सत्याचा विजय’ हा संदेश देणाऱ्या या नृत्यनाटिकेचे सादरीकरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कौतुकास्पद ठरले. या नृत्यनाटिकेचा प्रीमियर २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर इंडोनेशियातील बाली येथील प्रसिद्ध गरुडा विष्णू केंचना (GWK) कल्चरल पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. वाल्मिकी रामायणातील प्रसंग, प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र आणि भारतीय संस्कृतीतील मूल्ये नृत्य, अभिनय व संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली.
या नृत्यनाटिकेची संकल्पना, दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन तेजश्री अडिगे यांनी केले. नृत्यनाटिकेत पुढील कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या. स्वरा सनानसे (श्रीराम), ऋध्वी शिंदे (सीता), तेजश्री अडिगे (रावण), जिवेन गुजराथी (दशरथ), प्रियांका सनानसे (कौसल्या), तेजस्विनी इनामदार (कैकयी), आराध्या इनामदार (भरत), इरा देशमुख (लक्ष्मण), क्षोनिका गोराणे (हनुमान), अश्विनी मुकादम (शबरी), नितीन सनानसे (विश्वामित्र) आणि सुप्रिया कुलकर्णी (सुमित्रा). या सर्व कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कलात्मक योगदानाचे कौतुक करण्यात आले.
“पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय संस्कृती आणि प्रभू श्रीरामांचे आदर्श सादर केले, ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या शहरात अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना अधिकाधिक संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. अशा कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या पुढील वाटचालीला प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी आहे.” — शर्मिला बाबर (उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


