कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच बालकांना सुरक्षित भविष्य द्यावे — जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती शहरात बालविक्री व मानवी तस्करीसंदर्भात समोर आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. बालकांची खरेदी-विक्री करणे, आर्थिक मोबदल्यात बालकांचे हस्तांतरण करणे अथवा दत्तकाच्या नावाखाली कोणताही बेकायदेशीर व्यवहार करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारांपासून नागरिकांनी दूर राहून शासनमान्य कायदेशीर दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
बालक दत्तक घेणे ही केवळ कौटुंबिक इच्छा नसून ती बालकाच्या आयुष्याशी निगडित मोठी जबाबदारी आहे. अनाथ, परित्यक्त आणि समर्पित बालकांना कुटुंबाचा आधार मिळावा, हा या प्रक्रियेचा मूळ हेतू आहे. मात्र, काही वेळा मध्यस्थांमार्फत बालक मिळविणे, पैशांच्या मोबदल्यात ताबा घेणे, खोटी जन्मनोंदणी करणे किंवा खासगी कराराच्या आधारे दत्तक प्रक्रिया झाल्याचे भासविणे, असे प्रकार घडण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर बालकांची खरेदी-विक्री किंवा बेकायदेशीर हस्तांतरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिला आहे. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांनी अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांशी संपर्क न साधता शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच प्रक्रिया पूर्ण करावी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) हे केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत वैधानिक प्राधिकरण असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व दत्तक विनियम, २०२२ नुसार ही प्रक्रिया राबविली जाते. इच्छुक व पात्र पालकांनी CARA च्या CARINGS या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर पात्रतेची पडताळणी, गृहचौकशी, बालकाची कायदेशीर उपलब्धता, सामाजिक व वैद्यकीय अहवाल आणि नियमानुसार दत्तक आदेशाची कार्यवाही पूर्ण केली जाते.
दत्तक प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार किंवा अनधिकृत मध्यस्थी करू नये, तसेच जन्म प्रमाणपत्राचा गैरवापर करून चुकीची माहिती नोंदविणे, पालकत्व अनधिकृतरीत्या बदलणे किंवा बालकांची विक्री करणे हे गंभीर गुन्हे असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी नमूद केले आहे. बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस विभाग, बाल कल्याण समिती किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी नागरिकांना पुढीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बालक दत्तक घेण्यासाठी केवळ अधिकृत CARA / CARINGS प्रक्रियेचाच अवलंब करावा; एजंट किंवा मध्यस्थांमार्फत बालक घेऊ नये. जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही. अधिक माहिती व नोंदणीसाठी नागरिकांनी cara.wcd.gov.in या संकेतस्थळाला आणि carings.wcd.gov.in या पोर्टलला भेट द्यावी.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
