राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी महिला परिषदेत अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — विजय डवरे यांचे आवाहन!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २१ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस) आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणाऱ्या या परिषदेत अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनी केले आहे.
राज्यभरातून ५०० पेक्षा अधिक महिला व पुरुष या परिषदेत सहभागी होणार असून, दिवसभरात विविध महत्त्वपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सत्राचे अध्यक्षस्थान महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे भूषविणार आहेत. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांचे ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या विषयावर तरुणांचा परिसंवाद रंगणार असून, यामध्ये प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शितल वसावे आणि गौरी जाधव हे तरुण कार्यकर्ते आपले विचार मांडणार आहेत. समारोप सत्रास ज्येष्ठ साहित्यिका प्रा. नीरजा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, महा. अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३७ वर्षांपासून बुवाबाजी, भोंदूगिरी आणि महिलांची फसवणूक करणाऱ्या अघोरी प्रथांविरोधात संघटितपणे लढा देत आहे. समितीच्या पुढाकाराने जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १,५०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून अनेक भोंदू बाबा व मांत्रिकांना शिक्षाही झाली आहे.
बुवाबाजीविरोधातील लढा हा केवळ अंधश्रद्धेविरोधातील संघर्ष नसून महिलांचे शोषण, आर्थिक फसवणूक आणि मानसिक गुलामगिरीविरोधातील सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते व विवेकवादी सहकाऱ्यांनी एकजुटीने परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, साथी मंजू वासनिक, लता गजभिये, कीर्तिका सयामे, नरेंद्र धर्माळे, प्रमोद कोळमकर, दिलीप लाडे, दिगंबर मेश्राम, आशिष देशमुख आणि संदीप हिवराळे यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
