पीसीयू मध्ये ऑटोमेशन, करिअरच्या संधी आणि अप्रेंटिसशिपवर विशेष उद्योग परिसंवाद संपन्न; देश-विदेशातील तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २१ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड विद्यापीठ (PCU) येथे “ऑटोमेशन, करिअर ऑपॉर्च्युनिटीस अँड अप्रेंटिसशिप इन आयटीई” या विषयावर विशेष उद्योग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात देश-विदेशातील उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी औद्योगिक ऑटोमेशनचे बदलते तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ, अप्रेंटिसशिप आणि भविष्यातील करिअरच्या संधी या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या परिसंवादात इंटरनॅशनल टेस्ट इक्विपमेंटचे (ITE) अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नेत्रेश रेगे, इंटरनॅशनल व्हील अँड टायर इंकचे घनेम जंदाली, जेफ स्कोम्स्की, जर्मनीतील मिकॉन टेक्निक इंटरनॅशनलचे झ्बिग्न्यू स्कुटनिक आणि थॉमस ओझारी, तसेच पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे आदींनी औद्योगिक अभियांत्रिकी, ऑटोमेशन, यांत्रिक अभियांत्रिकी, चाचणी उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय या विषयांवर विचार मांडले:
त्यांनी इंटरनॅशनल टेस्ट इक्विपमेंटची उत्पादने, ग्राहकवर्ग आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कार्यपद्धतीची माहिती दिली. तसेच औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील उदयोन्मुख संधींवर प्रकाश टाकला. – नेत्रेश रेगे (अध्यक्ष व सीईओ, आयटीई)
अभियांत्रिकीतील नाविन्यपूर्ण कल्पना, त्यांचा प्रत्यक्ष औद्योगिक उपयोग आणि तांत्रिक ज्ञानासोबत उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. – घनेम जंदाली (उद्योजक, इंटरनॅशनल व्हील अँड टायर इंक)
कंपनीच्या अभियांत्रिकी क्षमता, विशेष यंत्रनिर्मिती आणि औद्योगिक ऑटोमेशनसाठी उपलब्ध तांत्रिक उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञानातील बदल आणि विशेष अभियांत्रिकी उपाययोजनांची वाढती मागणी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. – झ्बिग्न्यू स्कुटनिक व थॉमस ओझारी (मिकॉन टेक्निक इंटरनॅशनल, जर्मनी)
परिसंवादाच्या समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. करिअरच्या संधी, अप्रेंटिसशिप, व्यावसायिक क्षेत्रातील अपेक्षा, शैक्षणिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगात उपयोग, ऑटोमेशनमधील बदलते स्वरूप, बाजारपेठेतील संधी, जागतिक उद्योग कल, उत्पादन विकास, ग्राहकांच्या गरजा आणि आधुनिक उत्पादन प्रक्रियेत प्रगत चाचणी उपकरणांचे महत्त्व यांसारख्या विविध प्रश्नांवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांचे शंका निरसन केले.
हा उद्योग परिसंवाद पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीयू नियामक मंडळ सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

