पिंपरी-चिंचवडमध्ये आज वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल; व्ही.व्ही.आय.पी. दौऱ्यानिमित्त सुस ब्रिज ते सिम्बायोसिस कॉलेज (लवळे) मार्ग सर्व वाहनांसाठी बंद!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २१ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पुणे येथून सुस ब्रिज मार्गे सिम्बायोसिस कॉलेज, लवळे येथे आज (शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६) अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा (VVIP) दौरा नियोजित आहे. सुस ब्रिज ते सिम्बायोसिस कॉलेज या दरम्यानच्या मार्गावर रस्तादुभाजक (Divider) नसल्याने सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यान्वये याबाबतची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
सुस ब्रिजकडून सिम्बायोसिस कॉलेज, लवळेकडे जाणारा तसेच सिम्बायोसिस कॉलेजकडून सुस ब्रिजकडे येणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. आज, शनिवार दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० ते दुपारी ०२:०० (१४:००) वाजेपर्यंत ही तात्पुरती प्रवेशबंदी लागू राहील.
नागरिकांनी वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग १ वाहने सुस ब्रिज – ननावरे अंडरपास – बिटवाईस कंपनी येथून डावीकडे वळून सर्व्हिस रोडने राधा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग २ वाहने सुस ब्रिज – चांदणी चौक – भुगाव – पिरंगुट येथून उजवीकडे वळून घोटावडे फाटा – गोडांबेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग ३ चांदे-नांदेकडून येणारी वाहने नांदे येथून डावीकडे वळून व्ही.टी.पी. (VTP) सर्कल – हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
सदर वाहतूक बदलाच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी योग्य ते बॅरिकेडिंग करून वाहतूक वळविल्याचे माहिती फलक लावण्याच्या सूचनाही बावधन वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
