अमरावतीत २३ नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; फियाट ऑटोमोबाईल आणि जिनस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १५७ हून अधिक जागांसाठी थेट भरती!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २० नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात होणाऱ्या या मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून १५७ हून अधिक पदांसाठी थेट मुलाखतींद्वारे भरती केली जाणार आहे.
या मेळाव्यात पुण्यातील नामांकित ‘फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा. लि.’ कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून नेमणूक केली जाणार आहे. कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि पात्र ठरणाऱ्यांना तात्काळ संधी दिली जाईल.
पदसंख्या ८७ पेक्षा अधिक पदे, पात्रता इयत्ता १२ वी आणि आयटीआय (ITI – सर्व ट्रेड) उत्तीर्ण, १८ ते २४ वर्षे (पुरुष व महिला दोन्ही उमेदवार पात्र), निवड झालेल्या उमेदवारास १८,८५० रुपये मासिक विद्यावेतन (Stipend) देण्यात येईल. यासोबतच वाहतूक व्यवस्था, कॅन्टीन, गणवेश आणि सेफ्टी शूज अशा सुविधा कंपनीमार्फत पुरवण्यात येणार आहेत.
अमरावतीतील ‘जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ कंपनीमध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमध्ये मीटर बसविण्याच्या कामासाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे.
पदसंख्या ७० हून अधिक पदे (कायमस्वरूपी नोकरी), पात्रता इयत्ता १० वी, १२ वी, डिप्लोमा किंवा पदवीधर उत्तीर्ण, १८ ते ३५ वर्षे (केवळ पुरुष उमेदवारांसाठी), निवड झालेल्या उमेदवारास २०,००० रुपये मासिक वेतन दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी २३ नोव्हेंबर रोजी स्वखर्चाने बायोडाटा (Resume), पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह (Xerox) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास उमेदवारांनी ०७२१-२५६६०६६ / ८३०८९५६२३६ / ७६२०५६०१२५ / ८६०५६५४०२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
