शिरगाव येथील श्री साईबाबा ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा अपहार; भ्रष्टाचारी विश्वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याची उस्मान शेख यांची मागणी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मावळ तालुक्यातील शिरगाव येथील ‘श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ व संलग्न ‘श्री साईबाबा अन्नछत्र मंडळ’ यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप ट्रस्टचे संस्थापक व तहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख यांनी केला आहे. ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त रवी जाधव आणि उमेश कविटकर यांनी काही पोलीस अधिकारी व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दानपेटीतील रकमेची अफरातफर आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेस संस्थापक व तहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख, तहयात विश्वस्त समीर शेख, ॲड. अनघा कुलकर्णी, अक्षय धावरे, रामभाऊ गोपाळे आणि शिरगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहयात विश्वस्त समीर शेख यांनी ट्रस्टच्या कामकाजाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सांगितले की, हा सार्वजनिक न्यास ९ सप्टेंबर २००२ रोजी पुणे येथील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालयात (नोंदणी क्र. इ/३६७४/पुणे) नोंदणीकृत झाला आहे. स्थापनेवेळी तत्कालीन आमदार प्रकाश देवळे अध्यक्ष होते, तर त्यांच्यासमवेत प्रसाद दत्तात्रय पाटील, प्रमोद माणिक शेठ दुगड, धोंडीराम बाबा चव्हाण, उस्मान दगडू शेख, दिगंबर शेठ बाळासाहेब भेगडे आणि प्रा. नारायण सदाशिव फरांदे हे विश्वस्त होते.
माजी आमदार प्रकाश देवळे यांचे २४ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक रवी जाधव व उमेश कविटकर यांची विश्वस्त म्हणून नावे लावण्यात आली. त्यानंतर या दोघांनी इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता बेकायदेशीर आर्थिक व्यवहार सुरू केल्याचा आरोप समीर शेख यांनी केला आहे.
शिरगाव येथील साई मंदिरात पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक श्रद्धेने रोख रक्कम, सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने अर्पण करतात. दरमहा जमा होणाऱ्या लाखो रुपयांपैकी केवळ ठराविक रक्कम बँक खात्यात भरून उर्वरित रकमेचा वैयक्तिक कामासाठी वापर केला जात असल्याचा संशय आहे.
संबंधितांनी अनेकदा बेकायदेशीरपणे दानपेटी फोडून रकमेचा अपहार केला आहे. बँकेत भरलेल्या रकमेचा आणि नोटांच्या तपशिलाचा मेळ बसत नसून, तक्रार केल्यानंतर नोटांच्या तपशिलाची एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरातील बोगस कागदपत्रे एकाच दिवशी तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंदिर परिसरातील दुकानदारांकडून मिळणाऱ्या भाड्याचा हिशेब जुळत नाही. तसेच, अन्नछत्रातील दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पवित्र नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत आहे.
या गैरव्यवहारांबाबत स्थानिक पोलीस प्रशासन आणि पुणे येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात वारंवार लेखी तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे काही अधिकारी या भ्रष्टाचारात सामील असल्याचा संशय विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
मंदिरात जमा होणाऱ्या निधीचा उपयोग शिरगाव गावाच्या विकासासाठी व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा; अन्यथा १५ डिसेंबर २०२६ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उर्वरित विश्वस्त आणि शिरगावचे ग्रामस्थ तीव्र आंदोलन व उपोषण करतील, असा इशारा समीर शेख यांनी दिला आहे.
(टीप: या आरोपांसंदर्भात संबंधित विश्वस्त रवी जाधव व उमेश कविटकर यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


