पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध कल्याणकारी प्रस्तावांना मंजुरी; रस्ते, स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक उपक्रमांना मोठे बळ!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित पायाभूत सुविधा, रस्ते विकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
शहरातील विविध प्रभागांमधील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती, पावसाळी गटारे व नालेसफाई, अंतर्गत रस्ते, पदपथ आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, मोशी, डुडुळगाव, दिघी-बोपखेल, भोसरी, बुर्डेवस्ती, पठारे मळा, जाधववाडी, कुदळवाडी, बोऱ्हाडेवाडी आणि विनायकनगर आदी परिसरांतील विकासकामांचा समावेश आहे.
तसेच दिघी-आळंदी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटर, सबवे व उड्डाणपूल, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल आणि नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावरील विविध स्ट्रक्चर्सच्या रेलिंग, पर्जन्यजल वाहिन्यांची दुरुस्ती आणि रस्ते दुभाजकांच्या सुशोभीकरणास मान्यता देण्यात आली.
पवना थेट जलवाहिनी, ड्रेनेज मास्टर प्लॅन टप्पा-१, डीएमए स्थापना व नॉन-रेव्हेन्यू वॉटर प्रकल्प, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन टप्पा-२ आणि मोशी हॉस्पिटल प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ व इतर वित्तीय स्रोतांद्वारे निधी उभारणी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यासाठी स्वतंत्र निधी उभारणी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेकडे शिफारस करण्यास मंजुरी मिळाली.
प्रभागस्तरीय नालेसफाई, गटार साफसफाई, अतिक्रमण निष्कासन आणि सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ पुरविण्यास मान्यता देण्यात आली. एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दैनंदिन साफसफाई आणि नेहरूनगर येथील नवीन न्यायालय परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामास मुदतवाढ देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विविध विभागांसाठी कॉटरी मशीन खरेदी, रंगरंगोटी आणि भोसरी रुग्णालयातील स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली.
महिला सक्षमीकरण व सबलीकरण योजनेंतर्गत शहरातील महिला व मुलींना वस्तीपातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५७ विविध विषयांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. यामध्ये अकाउंट्स, फॅशन डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्युटी व वेलनेस, फूड प्रोसेसिंग, आयटी, डेटा ॲनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी आणि केटरिंग आदी आधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच झोपडपट्ट्यांमधील सेवाशुल्क बिलांचे वाटप आणि नागरिकांची माहिती मोबाईल ॲपद्वारे अद्ययावत करण्याचे काम महिला बचतगटांमार्फत करण्यास मान्यता दिल्याने बचतगटांना हक्काचा रोजगार मिळणार आहे.
मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, एनएमएमएस (NMMS), नवोदय परीक्षा सराव पुस्तके तसेच उर्दू व हिंदी माध्यमाच्या स्वाध्याय पुस्तिका खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इयत्ता पाचवी व नववीतील इच्छुक विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने सूर्यनमस्कार आणि भगवद्गीता प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या १०५ शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात १ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे नियोजन आहे.
शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी, संत तुकारामनगर आणि केशवनगर येथील सार्वजनिक ग्रंथालये ज्येष्ठ नागरिक संघ व महिला बचतगटांमार्फत चालविण्याच्या करारास ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्व २०२६ आणि मनपाच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच २१ ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे होणाऱ्या ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या प्रयोग कला महोत्सवासाठी अंदाजित २४ लाख ८५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली. निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानातील भव्य राष्ट्रध्वज फडकविणे, संचलन, देखभाल व यंत्रणा दुरुस्तीच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० साठी सल्लागार एजन्सी नेमणे, चिखली येथील आरक्षित जागा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख क्र. २ पुणे (उत्तर) कार्यालयास ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याची शिफारस करणे, तसेच लेखा विभागात दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सहा महिन्यांसाठी मानधनावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय पवना थेट पाइपलाइन लवाद प्रकरणातील वरिष्ठ विधिज्ञांचे कामकाज आणि क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील भोजन पुरवठा कामास कार्योत्तर मुदतवाढ देण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवड झाल्याबद्दल स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्थायी समिती सभेत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

