वाय.सी.एम. औषधसाठ्याबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण; ‘एफडीए’चा छापा नसून महापालिकेच्या पुढाकारातूनच तपासणी व कारवाई!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २१ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वाय.सी.एम.) येथील औषध भांडारातील औषधांच्या गुणवत्तेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. रुग्णालयात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त होताच महापालिकेने स्वतःहून तपासणीसाठी पाठपुरावा केला. FDA च्या अहवालानुसार संबंधित औषधे गुणवत्तेच्या मानकांनुसार नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उत्पादक कंपनी आणि पुरवठादारावर तीन वर्षांसाठी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने कळवले आहे.
थेरगाव रुग्णालयाकडून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी Cap. B-Complex with Zinc (CareZinc) या औषधाच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, महापालिकेने हा साठा वापरास प्रतिबंधित करून बाजूला ठेवला आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन, मोशी यांना पत्राद्वारे तपासणीसाठी ताब्यात घेण्याची विनंती केली. FDA च्या अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी नमुना ताब्यात घेतला. हे औषध मे. श्रीविनायक फार्मा, पुणे यांच्यामार्फत Inducare Pharmaceuticals and Research Foundation, Jejuri MIDC, Pune या कंपनीकडून पुरवण्यात आले होते.
१६ जुलै २०२६ रोजी प्राप्त FDA अहवालात Cap. B-Complex with Zinc हे औषध ‘Not of Standard Quality’ (गुणवत्तेच्या निर्धारित मानकांनुसार नसलेले) असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी उत्पादक कंपनी Inducare Pharmaceuticals and Research Foundation यांना तीन वर्षांसाठी काळ्या यादीत (Black List) टाकण्यात आले, तर पुरवठादार मे. श्रीविनायक फार्मा, पुणे यांनाही तीन वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आले.
२७ जुलै २०२६ रोजी मे. श्रीविनायक फार्माच्या १२ प्रकारच्या औषधांची तपासणी करण्यात आली; त्यापैकी ११ प्रकारची औषधे ‘Not of Standard Quality’ आणि २ औषधे मानकांनुसार असल्याचे समोर आले. त्यानुसार ४ नोव्हेंबर २०२६ रोजी FDA ने ११ प्रकारच्या औषधांचा संपूर्ण साठा ताब्यात घेतला.
FDA कडून ताब्यात घेण्यात आलेल्या ११ प्रकारच्या औषधांच्या साठ्याची एकूण किंमत ११ लाख ९५ हजार ८६३ रुपये (₹११,९५,८६३) इतकी आहे. मात्र, काही वृत्तांमध्ये ₹१ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ किमतीचा साठा जप्त केल्याचे नमूद करण्यात आले असून, प्रत्यक्ष साठ्याच्या किमतीत तफावत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच, या औषधांसाठी पुरवठादार कंपनीस कोणतीही रक्कम अदा करण्यात आलेली नसून रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
“वाय.सी.एम. रुग्णालयातील औषधांच्या साठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून कोणतीही छापेमारी (Raid) करण्यात आलेली नाही. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेत संबंधित औषधांचा साठा तपासणीसाठी FDA कडे पाठविला होता. औषधांच्या गुणवत्तेची खात्री करणे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने महापालिकेने ही कार्यवाही केली. त्यामुळे FDA कडून छापेमारी करून औषधसाठा जप्त केल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही.” — डॉ. लक्ष्मण गोफणे (आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने तातडीने संबंधित औषधांचा साठा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली. FDA कडून वाय.सी.एम. रुग्णालयात कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, औषधांची गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेतला होता. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उत्पादक कंपनी व पुरवठादाराविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये, यासाठी या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.” — कुलदीप जंगम (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
