news
‘सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले, किरकोळ ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा केंद्रावर हल्लाबोल!‘पक्षनिष्ठेने काम करणे ही माझी चूक ठरली का?’; सचिन काळभोर यांचा घरचा अहेर, इतर निष्ठावंतांचाही मुद्दा उपस्थित!‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी परिसंवादात तरुणाई मांडणार विचार’; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचा संयुक्त पुढाकार!‘शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुस-लवळे रस्ता राहणार बंद’; पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून विशेष अधिसूचना जारी!‘औद्योगिक ऑटोमेशन आणि विशेष यंत्रनिर्मिती क्षेत्रात जागतिक संधींची रेलचेल’; पीसीयू येथील उद्योग परिसंवादात तज्ज्ञांचे विचार!
Home पिंपरी चिंचवड ‘पक्षनिष्ठेने काम करणे ही माझी चूक ठरली का?’; सचिन काळभोर यांचा घरचा अहेर, इतर निष्ठावंतांचाही मुद्दा उपस्थित!

‘पक्षनिष्ठेने काम करणे ही माझी चूक ठरली का?’; सचिन काळभोर यांचा घरचा अहेर, इतर निष्ठावंतांचाही मुद्दा उपस्थित!

२०१४ च्या भोसरी निवडणुकीचा संदर्भ देत आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराजी ठेवल्याचा आरोप; दिलीप राऊत,कैलास सानप,रोहिणी रासकर,मधुकर बच्चे, वैशाली खाडे यांच्यासह कार्यकर्त्यांना डावलल्याचा दावा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही मला डावलले; सचिन काळभोर यांचा पक्ष नेतृत्वाकडे न्यायासाठी सवाल!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) निष्ठेने काम करूनही वारंवार राजकीय संधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर यांनी केला आहे. पक्षाच्या माध्यमातून २०१७ आणि २०२६ मध्ये निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही, तसेच दोन्ही वेळेस स्वीकृत नगरसेवकपदासाठीही नियुक्ती झाली नसल्याने पक्ष नेतृत्वाने आपल्याला डावलण्यामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना सचिन काळभोर यांनी २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली. त्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी आपण मनापासून काम केले होते. मात्र, त्यानंतर स्थानिक राजकीय समीकरणांमुळे आपल्याला पक्षात काम करण्यापासून रोखण्यात आले आणि निवडणुकीत संधी नाकारण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.

सचिन काळभोर यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे हे अपक्ष उमेदवार होते. त्यावेळी आपण भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे महेश लांडगे यांनी आपल्यावर नाराजी ठेवली. २०१६-१७ च्या सुमारास त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ही नाराजी कायम राहिल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. महेश लांडगे यांनी वेळोवेळी आपण त्यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्याचा मुद्दा उपस्थित केला; मात्र आपण पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी काम केले होते, अशी भूमिका मांडल्याचे काळभोर यांनी सांगितले. पक्षनिष्ठेने काम करणे ही आपली चूक ठरली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दहा प्रभागांमध्ये नागरी समस्यांच्या निराकरणासाठी अहोरात्र काम करीत असल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, मोर्चे आणि विविध प्रकारची लढाई उभारल्यामुळे काही पोलीस ठाण्यांमध्ये आपल्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र हे सर्व गुन्हे नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना दाखल झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही निवडणुकीतील उमेदवारी आणि स्वीकृत नगरसेवकपद या दोन्ही संधी नाकारल्या गेल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या दिलीप राऊत, मधुकर बच्चे, कैलास सानप, संतोष तापकीर, वैशाली खाडे आणि रोहिणी रासकर यांसारख्या कार्यकर्त्यांनाही डावलले जात असल्याचा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे.

“मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला, नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढलो. मग माझी चूक नेमकी काय? पक्षासाठी काम केल्याचे बक्षीस म्हणून मला डावलले जात आहे का?” — सचिन सुदाम काळभोर (भाजप कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा तसेच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी, अशी विनंती काळभोर यांनी केली आहे.

(टीप: या आरोपांसंदर्भात आमदार महेश लांडगे किंवा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!