पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रोच्या लाईन ३ ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ११ नोव्हेंबरपासून या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या दोन्ही स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवले असून अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ च्या २३.३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावरील सध्या १७ स्थानके प्रवाशांसाठी सुरू आहेत. यापैकी जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. सध्या या मार्गावर २० गाड्या धावत असून, दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत (Peak Hours) दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध आहे. सेवा सुरू झाल्यापासून मेट्रोच्या गाड्या सुमारे ९९ टक्के वेळेवर धावत असल्याचे ‘पीआयटीसीएमआरएल’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
“प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला असून, हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बालेवाडी परिसरातील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याने प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल. उर्वरित स्थानकांची कामे दर्जा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पूर्ण केली जात आहेत.” — अनिल कुमार सैनी (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड)
या मेट्रो सेवेमुळे हिंजवडी आयटी पार्कचा पुण्यातील निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक भागांशी संपर्क अधिक सुलभ झाला असून, वाहतूक कोंडीतून सुटका करणारा सक्षम पर्याय प्रवाशांना उपलब्ध झाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


