news
‘जनगणना कायदा १९४८ अंतर्गत माहिती पूर्णपणे गोपनीय, अफवांवर विश्वास ठेवू नका’; महापालिका प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!‘श्रीक्षेत्र आळंदीतील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सामूहिक जबाबदारीने काम करणार’; महापालिका मुख्यालयात शिष्टमंडळाची बैठक!‘संघटन स्वातंत्र्य, वेतन व रोजगार सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा इशारा’; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची अपेक्षा!‘कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्या आणि लेखी अहवाल द्या’; ‘आप’ची प्रभाग कार्यालयाकडे आग्रही भूमिका!‘जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही’; जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांच्या महत्त्वाच्या सूचना!
Home पिंपरी चिंचवड ‘जनगणना कायदा १९४८ अंतर्गत माहिती पूर्णपणे गोपनीय, अफवांवर विश्वास ठेवू नका’; महापालिका प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!

‘जनगणना कायदा १९४८ अंतर्गत माहिती पूर्णपणे गोपनीय, अफवांवर विश्वास ठेवू नका’; महापालिका प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व उपायुक्त सचिन पवार यांचे सहकार्याचे आवाहन; १८५५ हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जनगणना-२०२७ साठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज; १० जानेवारीपासून डिजिटल स्वगणनेला प्रारंभ!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशाच्या विकासाचे नियोजन आणि विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणकांमार्फत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन माहिती संकलित केली जाईल, तर १ ते ५ मार्च २०२७ दरम्यान पुनरीक्षण फेरी राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

जनगणना-२०२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन, स्वगणना मोहीम आणि जनजागृतीबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

जनगणना-२०२७ चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली डिजिटल स्वगणना सुविधा. नागरिकांना se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन नोंदविता येणार आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून अथवा नव्याने लॉगिन करून कुटुंबातील सदस्यांची माहिती भरता येईल. माहिती सादर केल्यानंतर ‘P’ अक्षराने सुरू होणारा ११ अंकी स्वगणना ओळख क्रमांक (SE ID) मिळेल. हा क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक असून, प्रत्यक्ष गृहभेटीवेळी प्रगणकांना तो दाखविल्यास पडताळणी सुलभ होऊन वेळ वाचेल. २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन गणना करतील, तर १ ते ५ मार्च २०२७ दरम्यान पुनरीक्षण फेरी होईल. विशेषतः तरुणांनी व तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कुटुंबांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जनगणनेदरम्यान संकलित करण्यात येणारी वैयक्तिक व कौटुंबिक माहिती जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत गोपनीय ठेवली जाते आणि तिचा वापर केवळ कायद्याने निश्चित केलेल्या जनगणनेच्या उद्देशापुरताच केला जातो. जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीकडून ओटीपी (OTP), पिन (PIN) किंवा अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात नाही. नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती द्यावी आणि समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

“जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण आधार आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती नोंदविली जाणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा तसेच प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना योग्य व संपूर्ण माहिती देऊन जनगणना-२०२७ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.” — डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका)

“पिंपरी-चिंचवड शहरातील जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज होत आहे. स्वगणनेनंतर प्राप्त होणारा ११ अंकी SE ID जतन करून ठेवावा आणि प्रत्यक्ष गणनेवेळी प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा. ‘आपली जनगणना, आपला विकास’ आणि ‘जनगणना से जन कल्याण’ या ब्रीदवाक्यांनुसार नागरिकांनी हे राष्ट्रीय कर्तव्य यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.” — कुलदीप जंगम (अतिरिक्त आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी)

“जनगणना-२०२७ ची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी स्वतःहून स्वगणनेत सहभागी व्हावे आणि गृहभेटीवेळी प्रगणकांना संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती देऊन कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची माहिती देऊ नये.” — सचिन पवार (उप आयुक्त)

अधिक माहिती व संपर्क: जनगणनेविषयी अधिक माहितीसाठी नागरिकांनी www.censusindia.gov.in या संकेतस्थळाला, स्वगणनेसाठी se.census.gov.in या पोर्टलला भेट द्यावी किंवा १८५५ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!