दिवंगत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे — उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे दि. २४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: दिवंगत अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. या शहराच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि शहराला विकासाची नवी दिशा दिली. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करावे, असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयात घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीच्या सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठा, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक व औद्योगिक विकास यांसह सुमारे १९ विविध क्षेत्रांतील विकासकामांचे सादरीकरण केले. शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन भविष्यातील गरजांनुसार विकासाचे नियोजन करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.
शहरातील नागरी समस्यांवर बोट ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला खालील महत्त्वाचे निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी, कमी दाबाने होणारा पुरवठा, गढूळ पाणी आणि गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याच्या समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. ‘अल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. तसेच, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे इतर भागांतून शहराकडे होणारे संभाव्य स्थलांतर लक्षात घेऊनही आवश्यक ती पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मोशी कचरा डेपोतील दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेला चांगले यश मिळाले असले, तरी कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून शहर अधिक स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यावर भर द्यावा, असेही त्या म्हणाल्या.
या आढावा बैठकीस महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तसेच विविध पदाधिकारी, नगरसदस्य व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
