यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयास महापौर रवि लांडगे यांनी बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) प्रत्यक्ष भेट देऊन वैद्यकीय सेवा, पायाभूत सुविधा आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयाच्या कामकाजातील त्रुटी दूर करून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तत्पर वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने प्रलंबित प्रश्न तातडीने व कालबद्ध पद्धतीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रुग्णालय व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी महापौरांनी पुढील प्रमुख उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयातील जीर्ण झालेल्या ऑक्सिजन वाहिन्या बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच, वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करावेत. रुग्णालयात रक्ताची उपलब्धता सुरळीत राहण्यासाठी महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. यासोबतच औषधांची उपलब्धता, गुणवत्ता आणि नियमित पुरवठा सुनिश्चित करावा. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर रुग्णालयाचे अद्ययावत व नागरिकाभिमुख संकेतस्थळ विकसित करावे आणि ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी स्वतंत्र मदत कक्ष (Help Desk) कार्यान्वित करावा. परिसरात दिशादर्शक व माहिती फलक उभारणे, लिफ्टविषयक अडचणींचे निराकरण करणे, वाहनतळ व्यवस्थेत सुधारणा करणे आणि आकस्मिक वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्या कामकाजातील अडचणी सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. शवगृहात विनामूल्य साहित्य: मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शवगृह विभागामार्फत मृतदेहासाठी आवश्यक कापड व इतर अनुषंगिक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा मिळणे आवश्यक असून, रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले. या पाहणीप्रसंगी नगरसेवक योगेश बहल, जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


