“आम्हा कलाकारांचा आत्मा एक”; ‘रंगानुभूति’ नाट्य प्रयोगकला महोत्सवाचा उत्साहात समारोप!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: नाट्य महोत्सवांच्या निमित्ताने एखाद्या वारी किंवा जत्रेप्रमाणे कलाकार ठिकठिकाणी कला सादरीकरणासाठी फिरत असतात. आम्ही सगळे कलाकार कोणत्या नात्याने एकमेकांशी जोडले आहोत हा विचार आला, की उत्तर मिळते—आम्हा कलाकारांचा आत्मा एक आहे, असे प्रतिपादन भारतीय चित्रपट डिव्हिजनचे माजी विभागप्रमुख समर नखाते यांनी केले. ‘रंगानुभूति : पूर्वरंग ते उत्तररंग’ नाट्य प्रयोगकला महोत्सवाच्या सांगता समारंभात मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) ते निगडी येथील गदिमा नाट्यगृहात बोलत होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव पार पडला. समारोपावेळी रंगकर्मी आणि महाराष्ट्रातील प्रायोगिक नाट्य चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या संस्थांचा ‘प्रयोगकला सन्मानाने’ गौरव करण्यात आला.
महोत्सवातील आपल्या मनोगतात समर नखाते यांनी रंगकर्मींच्या एकजुटीवर आणि महापालिकेच्या सहकार्यावर भर दिला. जगभरात कलेच्या नात्याने कलाकारांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे. हे नाते जपण्यासाठी रंगमंच साथ देतो. महोत्सवामुळे कलाकार जोडले जातात आणि रसिकांना दर्जेदार कलाकृती पाहायला मिळतात. ‘रंगानुभूति’ महोत्सवाला पिंपरी-चिंचवड महापालिकेची साथ मिळत आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे म्हणाले की, नाट्य प्रयोगकला महोत्सव ही अशी जागा आहे जिथे समान ध्येयाने काम करणारे रंगकर्मी एकत्र येतात. एरवी पाहता येणार नाहीत अशा भारतभरातील आणि विविध भाषांतील नाटकांचे प्रयोग येथे पाहण्याची संधी मिळते.
थिएटर वर्कशॉप कंपनी चार वर्षांपासून शहरात रंगानुभूति महोत्सव आयोजित करत असून, गेल्या दोन वर्षांपासून महापालिका सोबत आहे ही जमेची बाजू आहे. मागील वर्षीचा महोत्सव दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला होता आणि त्यांनी नाट्यमहोत्सव भरवणे ही इतर मूलभूत कामांप्रमाणेच महत्त्वाची बाब असल्याचे म्हटले होते, याची आठवण काढत तसा विचार मांडणारे पवार आज आपल्यात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रायोगिक नाट्य चळवळ समृद्ध करणाऱ्या संस्था व कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उत्कर्ष कलाविष्कार (भुसावळ), अग्नीमित्र (पुणे), संवाद (सातारा), चिंचवड मल्याळम समाज (चिंचवड) आणि महाराष्ट्रीय कलोपासक (पुणे). आसाममधील ‘बाडुनगडुप्पा’ संस्थेचे रंगकर्मी मदन राभा आणि निलोत्पल बरुआ यांचा कार्यशाळा व सादरीकरणाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.पिंपरी-चिंचवडच्या चित्रकारांनी साकारलेल्या ‘शेती करणारी महिला’ आणि ‘निसर्ग’ या विषयांवरील चित्रांच्या प्रदर्शनासाठी विशेष योगदान देणाऱ्या संस्कार भारती संस्थेचाही गौरव करण्यात आला.
महोत्सवाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD) स्टेज मॅनेजर अभिषेक मुद्गल यांनी ‘फिजिकल थिएटर’ विषयी कार्यशाळा घेतली. दुसऱ्या सत्रात पश्चिम बंगाल येथील ‘एबॉन्ग आमरा’ संस्थेने ‘राधा कृष्ण’ हे नाटक सादर केले. सन्मान सोहळ्यानंतर ‘तमाशा थिएटर’ चे ‘ओट्टम बोर्न टु रन’ हे नाटक सादर होऊन महोत्सवाची रंगतदार सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पवार यांनी केले, तर अमृता ओंबळे यांनी आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

