दुर्गादेवी टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात ‘चिपको आंदोलन’; बंद वॉटर पार्क किंवा ‘वेस्ट टू एनर्जी’च्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्याची मागणी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
निगडी: पिंपरी-चिंचवड शहराचा ऑक्सिजन झोन असलेल्या निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवरील २२७ वृक्ष पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी तोडण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी तीव्र ‘चिपको आंदोलन’ छेडण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ८ ते १० या वेळेत नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी नोटीस लावलेल्या झाडांना मिठी मारून प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. “झाडे वाचवा, ऑक्सिजन वाचवा” अशा घोषणांनी यावेळी टेकडीचा परिसर दणाणून गेला.
दुर्गादेवी टेकडीवर पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉक, योगा आणि व्यायामासाठी येतात. महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी असताना स्वतः तीन दिवस वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊन ही टेकडी फुलवली होती, अशी आठवण सांगत मारुती भापकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
नियोजित उंच पाण्याची टाकी दुर्गादेवी टेकडीवर बांधून २२७ वृक्ष तोडण्याऐवजी, जवळच असलेल्या बंद वॉटर पार्क किंवा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या जागेवर उभारावी, अशी ठाम मागणी भापकर यांनी केली. हरकती व सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळू नये, या हेतूने प्रशासनाने घाईघाईत नोटीस लावल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षात या प्रकल्पासाठी २२७ पेक्षाही अधिक वृक्षांची कत्तल होण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना मारुती भापकर यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील प्रकल्पांचा दाखला देत सरकारच्या पर्यावरण धोरणावर टीका केली. लोणावळा ते पन्हाळा दरम्यान ५९ जलविद्युत प्रकल्प, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील टोरंट प्रकल्पासाठी ६०० एकर वनजमीन व ३४,६०० वृक्षतोड, मावळात ७० हजार वृक्षतोड आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अदाणी प्रकल्पासाठी लाखो वृक्ष तोडण्यास परवानगी दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडचे हृदय असणाऱ्या दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोडीचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले.
हरकती व सूचनांचा केवळ फार्स करून प्रशासनाने वृक्षतोडीला प्राधान्य दिल्यास, शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि टेकडीवर येणारे ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या चिपको आंदोलनात मारुती भापकर यांच्यासह वैजनाथ शिरसाट, भगवान पठारे, रघुनाथ रोकडे, आप्पासाहेब पाटील, संतोष मुंगसे, विकास नाणेकर, तानाजी मांडवे, गणेश जन्नरकर, मनोज ढेरे, सनी पवार, बापू जाधव, कुलदीप बोरकर, ॲड. कैलास भालेकर, सुनिल जांभळे, अशोक टिळेकर, निलेश शिंदे, जितेंद्र चावडा, कोळी मामा, बाबा मोहिते, रोकडे गुरुजी, प्रशांत मातेरे, भावेश पटेल यांच्यासह विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

