‘अजातशत्रू – अजितदादा’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते भव्य अनावरण!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते लोककवी सीताराम नरके लिखित ‘अजातशत्रू – अजितदादा’ या भावस्पर्शी कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाचे (Cover Page) अनावरण करण्यात आले.
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात स्व. अजितदादा पवार यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके होते (ज्याची बेरीज ‘६’ येते). या घटनेचा संदर्भ आणि दादांच्या स्मृती जपण्यासाठी कवी सीताराम नरके यांनी या काव्यसंग्रहात एकूण ६६ कविता समाविष्ट केल्या आहेत. दादांचे नेतृत्व, लोकसंग्रह, कर्तृत्व, माणसामधली माणुसकी आणि जनतेवरील निरपेक्ष प्रेम या सर्वांना या कवितांमधून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या संग्रहातील “असे कसे गेलात हो पोरकी करून माती” ही कविता अत्यंत भावस्पर्शी ठरली आहे. कवी सीताराम नरके यांनी आतापर्यंत ६५ हून अधिक ठिकाणी या कवितेचे वाचन केले आहे. ज्या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला, तसेच ज्या ठिकाणी दादांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे प्रत्यक्ष जाऊन कवीने या कवितेद्वारे दादांना शब्दसुमनांजली वाहिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमोर राळेगणसिद्धी येथेही या कवितेचे सादरकरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची इच्छा स्वतःहून व्यक्त केली आहे.
पत्रकार रोहित खर्गे यांनी कवी सीताराम नरके यांची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यानुसार २१ जुलै रोजी झालेल्या भेटीत भोईर यांच्या हस्ते या मुखपृष्ठाचे अनावरण पार पडले.
याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर भावूक होऊन म्हणाले:
“अजितदादा हे फक्त शब्द देणारे नेते नव्हते, तर दिलेला शब्द प्राणपणाने पाळणारे लोकनेते होते. मी दादांचा निष्ठावान कार्यकर्ता असून त्यांचे विचार, कार्य आणि लोकसेवेची परंपरा पुढे नेण्यासाठी माझे संपूर्ण जीवन समर्पित करणार आहे.”
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच ‘अजातशत्रू – अजितदादा’ या कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती कवी सीताराम नरके यांनी दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
