“आंदोलकांना आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी माफी मागावी, अन्यथा काळे फासू!” — कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा आक्रमक इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “आंदोलक म्हणजे आतंकवादी” असे वक्तव्य करून शेतकरी, कामगार आणि लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या लाखो आंदोलकांचा अपमान करणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी तातडीने देशवासीयांची माफी मागावी. अन्यथा त्यांना राज्यभरात कुठेही गाठून तोंडाला काळे फासले जाईल, असा थेट व अत्यंत आक्रमक इशारा ‘कष्टकरी संघर्ष महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेताना काशिनाथ नखाते म्हणाले की, हे विधान अत्यंत दुर्दैवी, लोकशाहीविरोधी आणि देशातील आंदोलनांच्या समृद्ध इतिहासाचा अवमान करणारे आहे.
विशेष म्हणजे, स्वतः सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक, शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठी हजारो आंदोलने केली आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमुळेच खोत यांना राजकारणात ओळख मिळाली आणि पुढे मंत्रीपदाची संधी मिळाली. “ज्या आंदोलनांनी त्यांना राजकीय ओळख अन् मंत्रीपद दिले, त्याच आंदोलकांना आज ते दहशतवादी म्हणत आहेत; ही कृतघ्नतेची परिसीमा आहे,” अशी जोरदार टीका नखाते यांनी केली.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला असताना त्यावर ठोस न बोलणारे सदाभाऊ खोत दिल्लीतील आंदोलनांवर मात्र विष ओकत आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. काशिनाथ नखाते पुढे म्हणाले:
“भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते शेतकरी, कामगार, विद्यार्थी व महिलांच्या हक्कांपर्यंत देशातील सर्व ऐतिहासिक परिवर्तन आंदोलनांतूनच घडली आहेत. त्यामुळे आंदोलकांना दहशतवादी संबोधणे म्हणजे थेट संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान करणे आहे.”
सदाभाऊ खोत यांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा कष्टकरी संघर्ष महासंघ व राज्यातील तमाम आंदोलक कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल त्वरित जाहीर माफी न मागितल्यास राज्यभरात त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने केली जातील आणि त्यांना काळे फासून निषेध नोंदवला जाईल, असा पुनरुच्चार काशिनाथ नखाते यांनी केला आहे. या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
