१० वर्षांपासून फरार असलेला बलात्कार अन् POSCO गुन्ह्यातील आरोपी कर्नाटकतून गनिमी काव्याने जाळ्यात; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची धडक कारवाई!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या ‘खंडणी विरोधी पथका’ने अत्यंत कौशल्याने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक मोठी कामगिरी बजावली आहे. गेली १० वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार (POSCO) गुन्ह्यातील सराईत फरार आरोपीला कर्नाटक राज्यातून बेड्या ठोकून जेरबंद करण्यात आले आहे.
निगडी पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ७२६/२०१६, भा.दं.वि. कलम ३७६ तसेच पोक्सो ॲक्ट (POSCO Act) कलम ४, ५ (जे)(२) अन्वये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात आरोपी हनुमंत दुर्गाप्पा कुन्हाडे (मुळ रा. अंकुश आनंद हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी, पुणे; सध्या रा. मधु रायरपुरा, ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी, कर्नाटक) हा गेल्या १० वर्षांपासून सतत पोलिसांना चकवा देत फरार होता.
या फरार आरोपीबाबत खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार रमेश मावसकर यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी सध्या कर्नाटक राज्यात लपून बसल्याचे समजताच, त्याचा मोबाईल क्रमांक ६३६०६६३५३१ प्राप्त करण्यात आला.
सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील कानगुडे यांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी कुरागुंड (ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी, राज्य कर्नाटक) येथे लपल्याचे निष्पन्न झाले.
माहितीची खात्री पटताच, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि वपोनि राजेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार सपोउपनि गायकवाड, पोहवा मावसकर, पोहवा चौधरी आणि पोशि जाधव यांच्या विशेष पथकाने कर्नाटकात धडक देऊन सापळा रचला. १० वर्षांपासून फरार असलेल्या ३४ वर्षीय आरोपी हनुमंत दुर्गाप्पा कुन्हाडे यास कुरागुंड येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी निगडी पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी, नीलेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
