news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरू; एकाच छताखाली मिळणार सर्व शासकीय आरोग्य योजनांचे लाभ

पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरू; एकाच छताखाली मिळणार सर्व शासकीय आरोग्य योजनांचे लाभ

आमदार अमित गोरखे, उमा खापरे व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; रुग्णांच्या मदतीसाठी आरोग्यमित्रांची नियुक्ती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षा’चे भव्य उद्घाटन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ अत्यंत सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षा’चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते या कक्षाचे लोकार्पण पार पडले.

या नवनिर्मित महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत प्रमुख योजनांचा लाभ रुग्णांना सहज व गतीने मिळवून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महापौर सहाय्यता निधी, आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे, रुग्णालयांशी थेट समन्वय साधणे आणि पात्र लाभार्थ्यांना मदत करणे, यासाठी हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारनगरी असल्याने अनेक कुटुंबांना गंभीर आजारांच्या उपचारावर होणाऱ्या प्रचंड खर्चाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन या कक्षाच्या माध्यमातून पात्र रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत (कॅशलेस) उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेने दोन आरोग्यमित्रांची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे.

नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनोज शिंदे: ८४१२९९५५९९, अभिजित पानखेडे: ९११२४०४१८१, टोल-फ्री हेल्पलाईन: १८०० २३३ २२‍००

“राज्यातील ४,८०० हून अधिक शासकीय व खासगी रुग्णालये या योजनांशी जोडलेली आहेत. पात्र नागरिकांना कॅशलेस उपचाराचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी हा कक्ष अत्यंत उपयुक्त ठरेल.”- डॉ. ओमप्रकाश शेटे (प्रमुख, आयुष्मान भारत योजना, महाराष्ट्र)

“शहरातील कोणताही नागरिक केवळ आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. हा कक्ष नागरिक आणि शासन यांच्यातील सक्षम दुवा म्हणून कार्य करेल.”- महापौर रवि लांडगे

या सोहळ्यास आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह विविध पदाधिकारी, पालिका अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!