मोशी कचरा डेपो दुर्घटना: मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत वितरणाची प्रक्रिया वेगात; सन्नी माने, राहुल गायकवाड व वामन कसबे यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात रक्कम जमा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार तातडीने प्रशासकीय कार्यवाही हाती घेण्यात आली असून, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
-
स्व. सन्नी माने (एकूण ₹१० लाख): पत्नी मनीषा सन्नी माने यांच्या खात्यात ₹५ लाख, तर आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात ₹५ लाख जमा.
-
स्व. राहुल गायकवाड (एकूण ₹१० लाख): पत्नी भाग्यश्री राहुल गायकवाड यांच्या खात्यात ₹५ लाख, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२.५० लाख जमा.
-
स्व. वामन कसबे (एकूण ₹१० लाख): पत्नी सुमन वामन कसबे यांच्या खात्यात ₹१० लाख जमा.
-
स्व. अक्षय सावंत (एकूण ₹१० लाख): यापूर्वीच सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात ₹१० लाख जमा करण्यात आले आहेत.
दुर्घटनेतील इतर मृत नागरिक — भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील — यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही विनाविलंब १० लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात येईल.
“मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता होताच रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे. बाधित कुटुंबांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध आहे.”- डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका)
“बाधित कुटुंबीयांना तातडीने दिलासा मिळावा हीच पालिकेची मुख्य भूमिका आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला मदतीसाठी वाट पाहावी लागू नये, यासाठी प्रशासनाला जलद कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पात्र वारसांना वेळेत मदत सुपूर्द केली जाईल.”- रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
