पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला उदंड प्रतिसाद! १३ हजार मालमत्ताधारकांकडून १५ कोटींचा कर जमा; ३० सप्टेंबरपर्यंत सवलतीची मुदत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनलाईन मालमत्ता कर सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ जुलै २०२६ पासून सुरू झालेल्या सामान्य करावरील ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेचा अवघ्या २२ दिवसांत १३ हजार १४१ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून, त्याद्वारे महापालिकेच्या तिजोरीत १५ कोटी रुपयांचा ऑनलाईन महसूल जमा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ ते २२ जुलै २०२६ (सकाळी १० वाजेपर्यंत) शहरात ५४७ कोटी ९ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे.
नागरिकांचा वेळ वाचावा आणि कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ व्हावी, यासाठी महापालिकेने १ जुलैपासून ४ टक्के ऑनलाईन सवलतीची ही विशेष योजना अमलात आणली आहे. ही सवलत योजना येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
डिजिटल कर भरण्याला गती देण्यासाठी कर संकलन विभागामार्फत रोज सुमारे १ ते ३ लाख मालमत्ताधारकांना मोबाईलवर एसएमएस (SMS) पाठवून सवलत योजनेची माहिती दिली जात आहे. तसेच सोशल मीडियावरून पोस्ट, व्हिडिओ आणि संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिकेने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्यांसाठी ४ टक्के सवलत उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत ऑनलाईन मालमत्ता कर भरावा आणि जबाबदार नागरिक म्हणून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.”- रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका)
“महापालिकेकडून मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार जप्ती कारवाईसह अन्य कायदेशीर उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन कर भरून ४ टक्के सवलत मिळवावी आणि पुढील कडक कारवाई टाळावी.”- सचिन पवार (उपआयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
