मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भव्य महारक्तदान शिबिर यशस्वी; ४७२९ रक्तपिशव्यांचे संकलन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आणि शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २२ जुलै २०२६) शहरात भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, दिवसभरात तब्बल ४,७२९ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील ३२ प्रभागांत मिळून ४३ ठिकाणी या शिबिरांचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा, मंगल कार्यालये, समाजमंदिरे, देवस्थाने आणि जनसंपर्क कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या सर्वच केंद्रांवर सकाळपासूनच नागरिक, महिला आणि तरुणाईचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी ठिकठिकाणी भेटी देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, महापौर रवी लांडगे, सभागृहनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडे, विकास डोळस यांच्यासह तिन्ही मतदारसंघांतील नगरसेवक-नगरसेविका, मंडल अध्यक्ष आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या सामाजिक उपक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. शत्रुघ्न काटे म्हणाले
“रक्तदानासारख्या पवित्र आणि जीवनदायी उपक्रमात पिंपरी-चिंचवडच्या जनतेने दाखवलेले हे प्रेम आणि सामाजिक भान अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी जपत इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करून नागरिकांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय पथके, विविध सामाजिक संस्था आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करणारे सर्व नागरिक यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

