news
Home पिंपरी चिंचवड महापालिका प्रकल्प व पाणीपुरवठा केंद्रांच्या वीजजोडण्या वेळेत पूर्ण करण्याचे महावितरणला आदेश

महापालिका प्रकल्प व पाणीपुरवठा केंद्रांच्या वीजजोडण्या वेळेत पूर्ण करण्याचे महावितरणला आदेश

महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी पालिका अन् महावितरण ॲक्शन मोडवर! महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला प्रलंबित प्रश्नांचा आढावा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अखंडित, दर्जेदार व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, तसेच महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना आवश्यक वीजजोडण्या वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महापालिका मुख्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.

बैठकीत शहरातील रस्ते खोदाई, वीजबिल तक्रारी आणि पालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. प्रामुख्याने या विषयांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. रावेत परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे. महापालिकेची जलशुद्धीकरण केंद्रे (WTP), सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), जॅकवेल व पंप हाऊससाठी नवीन वीजजोडण्या, ट्रान्सफॉर्मर उभारणी, DP, आरएमयू आणि मीटर बसवण्याचे काम वेळेत पूर्ण करणे. रस्ते खोदाईपूर्वी महापालिकेशी पूर्वसमन्वय साधणे आणि काम पूर्ण झाल्यावर रस्ते तात्काळ पूर्ववत करणे. ग्राहकांच्या वाढीव वीजबिले, पीडी मीटर आणि तांत्रिक त्रुटींसंबंधीच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने करणे.

“शहरातील प्रत्येक नागरिकाला विनाखंड आणि दर्जेदार वीज मिळणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. महावितरणने नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे.” – महापौर रवि लांडगे

“महापालिकेच्या विकासकामांमध्ये वीजजोडणी किंवा तांत्रिक मंजुरीमुळे कोणताही विलंब होता कामा नये. पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रकल्पांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता महावितरणने घ्यावी.”- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता लहानू विश्वनाथ व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून, दोन्ही प्रशासनांमधील समन्वय अधिक मजबूत करून नागरिकांना दिलासा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!