news
Home पिंपरी चिंचवड भुकेला जात, धर्म अन् विचारसरणी नसते; डॉ. धनंजय भिसे यांचे ‘गरीबी’ ग्रंथावर मार्मिक भाष्य

भुकेला जात, धर्म अन् विचारसरणी नसते; डॉ. धनंजय भिसे यांचे ‘गरीबी’ ग्रंथावर मार्मिक भाष्य

मानवी मूल्ये अन् संविधानात्मक न्यायाची आग्रही मांडणी; 'काठीकार' सूर्यवंशी यांच्या संघर्षाला सलाम | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गरीबी म्हणजे अभावाची कहाणी नव्हे, तर संघर्षातून घडणाऱ्या माणुसकीची शाळा; ‘काठीकार’ विजयकुमार सूर्यवंशी यांच्या ‘गरीबी’ ग्रंथावर डॉ. धनंजय भिसे यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: “गरीबी ही केवळ उत्पन्नाचा किंवा पैशांचा अभाव नसून मानवी जीवनातील मूलभूत गरजा अपूर्ण राहण्याची वेदनादायी अवस्था आहे. मात्र, याच गरिबीच्या कुशीत वाढणाऱ्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात ‘विनम्रता’ आणि ‘विद्रोह’ हे दोन सामर्थ्यवान गुण एकत्र विकसित होतात. म्हणूनच गरिबी माणसाला मोडत नाही, तर ती त्याला घडवते,” असे परखड व अत्यंत अभ्यासपूर्ण मत मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि विचारवंत डॉ. धनंजय भिसे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व प्रसिद्ध साहित्यिक ‘काठीकार’ विजयकुमार सूर्यवंशी लिखित ‘गरीबी’ या वैचारिक आणि सामाजिक ग्रंथाचे डॉ. धनंजय भिसे यांनी अत्यंत सखोल व हृदयस्पर्शी परीक्षण केले असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या समीक्षेमुळे साहित्य वर्तुळात डॉ. भिसे यांच्या वैचारिक उंचीचे मोठे कौतुक होत आहे.

डॉ. धनंजय भिसे यांनी विजयकुमार सूर्यवंशी यांच्या जीवनप्रवासाचा गौरव करताना सांगितले की, लहानपणी परिस्थितीने हातात गुराख्याची आणि उदरनिर्वाहासाठी हलगीची काठी दिली; परंतु शिक्षणावरील अढळ निष्ठेच्या जोरावर सूर्यवंशी यांनी त्या काठीचे रूपांतर पोलीस शिपायाच्या काठीत केले. ‘काठी’ (२००६) या आत्मकथनानंतर त्यांचा ‘गरीबी’ हा ग्रंथ मराठी साहित्यविश्वात सामाजिक वास्तव, दारिद्र्य आणि घटनात्मक मूल्यांचा शोध घेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

ग्रंथाचे विश्लेषण करताना डॉ. धनंजय भिसे यांनी भुकेच्या शाश्वत सत्यावर अत्यंत प्रभावी प्रकाश टाकला:

“भूक ही डावीही नसते आणि उजवीही नसते; ती फक्त भूक असते. तिचा कोणताही पक्ष, पंथ, जात किंवा धर्म नसतो. उपाशी पोटाला विचारसरणी समजत नाही, त्याला फक्त अन्न हवे असते. म्हणूनच भूक हा राजकारणाचा विषय नसून मानवतेचा विषय आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला सन्मानाने जगण्याचा आणि अन्नाचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही विचारसरणी पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही.”

डॉ. भिसे यांनी आपल्या समीक्षात्मक लेखातून भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला आहे. “गरीबी निर्मूलनासाठी केवळ आर्थिक मदत पुरेशी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, आरोग्यसेवा आणि संसाधनांचे न्याय्य वितरण आवश्यक आहे. हा लढा केवळ शासनाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून डॉ. धनंजय भिसे यांनी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि बहुजन साहित्याला वैचारिक दिशा देण्याचे काम केले आहे. ‘गरीबी’ या ग्रंथाकडे केवळ एका पुस्तकाचे परीक्षण म्हणून न पाहता, त्यांनी त्याला सामाजिक न्यायाच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या चळवळीशी जोडले आहे. त्यांच्या या अंतर्मुख करणाऱ्या आणि समाजाला दिशा दाखवणाऱ्या विश्लेषणाबद्दल साहित्यिक, विचारवंत आणि वाचक वर्गातून डॉ. धनंजय भिसे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!