डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारांची ख्रिश्चन समाजाला जोड; पुण्यात ‘आरपीआय ख्रिश्चन आघाडी’ची ऐतिहासिक स्थापना!
पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची मूळ विचारधारा ही संविधानाचे रक्षण, सामाजिक समता आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देणे हीच आहे. हाच सामाजिक न्यायाचा विचार आणि पक्षाची ताकद आता ख्रिश्चन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘आरपीआय ख्रिश्चन आघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून ख्रिश्चन समाजातील वंचित, गरजू नागरिक, तरुण आणि महिलांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना आक्रमकपणे वाचा फोडली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण माहिती आरपीआयचे ज्येष्ठ नेते व प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमानी कांबळे, आरपीआय ख्रिश्चन आघाडीचे नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी आणि इतर नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब जानराव यांनी आरपीआयच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे. आजही ख्रिश्चन समाजातील एक मोठा वर्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही गरीब कुटुंबांना या योजनांचा लाभ मिळत नाही. हीच त्रुटी दूर करण्यासाठी आरपीआय ख्रिश्चन आघाडी प्रत्येक वस्ती आणि प्रभागात काम करेल. शासकीय विभागांशी समन्वय साधून गरजूंपर्यंत थेट योजनांचे लाभ पोहोचवले जातील.”
आरपआय ख्रिश्चन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी यांनी ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी काम करण्याचा संकल्प जाहीर केला. ते म्हणाले, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने ख्रिश्चन समाजाच्या कल्याणासाठी दिलेली ही मोठी जबाबदारी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू. समाजातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या नव्या संधी मिळवून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळवून देणे आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध स्तरांवर उपक्रम राबवणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.”
या पत्रकार परिषदेमध्ये ख्रिस्तोफर राजमनी यांनी पुणे शहर ख्रिश्चन आघाडीची अधिकृत कार्यकारिणी जाहीर केली. डार्थी रॉड्रिक्स थॉमस – महिला अध्यक्षा, पुणे शहर, येसू जेम्स दोरास्वामी – उपाध्यक्ष, पुणे शहर, विनोद चंडालिया (ब्रदर) – पुणे कॅम्प विभागाध्यक्ष, फ्रान्सिस सांतामात्यि – हडपसर विभागाध्यक्ष, ओलोसिल प्रगासम – सोलापूर बाजार प्रभाग शाखाध्यक्ष, स्टेनली फ्रान्सिस नेथन – वानवडी शाखाध्यक्ष, विनेश पिल्ले – घोरपडी-मुंडवा प्रभागाध्यक्ष, रॉकी अँथोनी – वानवडी बाजार शाखाध्यक्ष, राजन राजमनी – कोंढवा शाखाध्यक्ष, रॉबर्ट दास – वडगाव शेरी शाखाध्यक्ष हि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थित नेत्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या नवीन संघटन रचनेमुळे पुणे शहरातील ख्रिश्चन बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आरपीआय पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
