पिंपरी-चिंचवड मनपाचा कारभार ‘मुख्य इमारती’तून की ‘ऑटो क्लस्टर’मधून? आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीवर सचिन काळभोर यांचा घणाघाती सवाल!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , ११ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे अधिकृत केंद्र आता पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत राहिलेले नसून, चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर’ हे ठिकाण महापालिकेचे समांतर अनधिकृत मुख्यालय बनल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुख्य इमारतीपेक्षा ऑटो क्लस्टरवरच अधिक मुक्काम आणि राबता असल्याचे उघड चित्र आहे. त्यामुळे या ‘ऑटो क्लस्टर’मधील बंद दाराआड चालणाऱ्या कामकाजाच्या पारदर्शकतेवर आता अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” असा जाहीर आणि थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.
या संदर्भात सचिन काळभोर यांनी प्रशासनाला जाब विचारत आयुक्तांच्या या संशयास्पद कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत ही शहराच्या कारभाराचे अधिकृत व घटनात्मक केंद्र आहे. संपूर्ण शहरातून हजारो गरीब, कष्टकरी आणि सामान्य नागरिक आपल्या रोजच्या तक्रारी, पाणी प्रश्न, रस्ते, आरोग्य आणि इतर नागरी समस्या घेऊन मुख्य इमारतीत केवळ आयुक्तांच्या भेटीसाठी लांबून चकरा मारतात. मात्र, तिथे गेल्यावर नागरिकांना “आयुक्त साहेब कार्यालयात उपलब्ध नाहीत,” असे कोरडे उत्तर देऊन वारंवार रिकाम्या हाताने परत पाठवले जाते.
दुसरीकडे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सर्वाधिक आणि अमूल्य वेळ चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये जात असल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे. एका बाजूला सामान्य जनतेसाठी आयुक्तांची असणारी कायमची अनुपलब्धता आणि दुसरीकडे ऑटो क्लस्टर येथे नियमित होणारी व्हीआयपी हजेरी, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत धक्कादायक माहितीनुसार, ऑटो क्लस्टर येथे महापालिकेच्या मुख्य इमारतीपेक्षा अधिक ‘महत्त्वाच्या’ आणि गुप्त बैठका पार पाडल्या जात आहेत. या बैठकांमध्ये सामान्य नागरिकांचा कोणताही प्रवेश नसतो.
सचिन काळभोर यांनी पत्रात म्हटले आहे की, “या गुप्त बैठकांमध्ये शहरातील बडे बिल्डर्स, बडे कंत्राटदार (ठेकेदार), तसेच काही ठराविक राजकीय पक्षांचे नेते, महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा प्रामुख्याने समावेश असतो. महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांची, विकासकामांच्या कोट्यवधींच्या अंदाजपत्रकाची आणि अत्यंत गोपनीय टेंडर प्रक्रियेची आखणी मुख्य इमारतीऐवजी ऑटो क्लस्टरच्या बंद दाराआड केली जात आहे. त्यामुळे, हे ठिकाण नक्की प्रशासकीय कामासाठी वापरले जात आहे की राजकीय आणि ठेकेदारीच्या ‘सेटिंग’साठी? याचा खुलासा आयुक्तांनी जाहीरपणे करावा.”
महापालिकेच्या संपूर्ण कामकाजामध्ये कमालीची पारदर्शकता, सुसूत्रता आणि कायद्याचे पालन असणे अपेक्षित असताना, अशा प्रकारे समांतर प्रशासकीय केंद्र निर्माण करणे हे प्रशासकीय शिस्तीचा आणि नियमांचा बोजवारा उडवणारे आहे. महापालिकेचे कामकाज हे संपूर्णपणे जनतेच्या करातून चालते आणि ते अधिकृत मुख्य कार्यालयातूनच चालणे बंधनकारक आहे. मात्र, अशा प्रकारे खासगी व बंद दाराआड चालणाऱ्या संशयास्पद बैठकांमुळे संपूर्ण महापालिकेच्या विश्वासार्हतेवर आणि प्रामाणिकतेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“आम्ही कष्टाचे काम सोडून आमच्या नागरी समस्या सुटाव्यात म्हणून मनपाच्या मुख्य इमारतीत जातो, पण तिथे आयुक्त कधीच नसतात. मग आमची कामे मार्गी लागणार कशी? प्रशासनाला आमच्या प्रश्नांचे काही देणेघेणे उरले नाही का?” अशा संतप्त प्रतिक्रिया त्रस्त नागरिकांमधून उमटत आहेत. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासन जर केवळ मोठ्या बिल्डरांच्या हितासाठी ऑटो क्लस्टरमध्ये अहोरात्र व्यस्त राहणार असतील, तर पिंपरी-चिंचवडच्या ३२ लाख सामान्य नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी, असा जळजळीत सवाल सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ या प्रकारावर पिंपरी-चिंचवडकरांसमोर अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि महापालिकेचा सर्व कारभार पुन्हा एकदा मुख्य प्रशासकीय इमारतीतून अत्यंत पारदर्शक व प्रामाणिकपणे सुरू करावा, अशी आग्रही मागणी आता संपूर्ण शहरातून जोर धरू लागली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
