news
नवी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची हाय-व्होल्टेज बैठक! मोदी सरकारला घेरण्यासाठी २३ विरोधी पक्ष एकत्र, उद्धव ठाकरे व्हर्च्युअली जॉईनशेगावात भक्तीचा महासागर! श्री परमहंस परशराम महाराज महिमा ग्रंथाचे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक पारायणअमरावती अंनिसचा राज्यस्तरावर डंका! अहिल्यानगरच्या बैठकीत ‘लक्ष्यवेधी शाखा’ आणि प्रफुल्ल कुकडे यांना ‘लक्ष्यवेधी कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदानरक्ताच्या नात्या पलीकडचे अथांग माहेर! सासवडच्या ‘ममता बाल सदन’मध्ये रंगला २२० लेक-जावयांचा ऐतिहासिक सन्मान सोहळापिंपरी-चिंचवडमध्ये ‘मान्सून कृती आराखडा २०२६’ लागू! संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी मनपाचे २४ तास पूर नियंत्रण कक्ष सुरू
Home पुणे रक्ताच्या नात्या पलीकडचे अथांग माहेर! सासवडच्या ‘ममता बाल सदन’मध्ये रंगला २२० लेक-जावयांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा

रक्ताच्या नात्या पलीकडचे अथांग माहेर! सासवडच्या ‘ममता बाल सदन’मध्ये रंगला २२० लेक-जावयांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा

माईंच्या पश्चात दीपकदादा गायकवाड यांनी निभावली 'बापमाणसाची' भूमिका; अधिक मासाच्या वाणाने लेकी भारावल्या, पुरंदरच्या कुंभारवळणमध्ये मायेचा अनुपमेय सोहळा | © २०२६मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माईंच्या “लेकी-जावयांच्या” सोहळ्यात अश्रूंचा पूर; कुंभारवळण येथे २२० कुटुंबांचा रंगला अभूतपूर्व सन्मान सोहळा!

सासवड (पुणे)/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सासवड (पुणे): “आई (माई) गेल्यानंतरही लेकींचे माहेर कधी संपत नाही, ते एखाद्या कर्तव्यदक्ष माणसाच्या रूपाने जिवंत राहते, याचा प्रत्यक्ष आणि डोळे भिजवून टाकणारा प्रत्यय आज पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला.”

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेल्या अथांग व मायाळू विशाल कुटुंबातील जिव्हाळा, नात्यांची घट्ट वीण आणि मायेचे संस्कार पुन्हा एकदा अधोरेखित झाले. निमित्त होते, ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “अधिक मासाचे वाण – माईंच्या लेकजावयांचा सन्मान” या सोहळ्याचे. या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाच्याच भावनांचा आणि आठवणींचा महापूर उसळला.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ, कीर्ती सपकाळ, ज्योती सपकाळ, मंजुषा सपकाळ आणि गौरी सपकाळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना अत्यंत भावविवश होऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

त्या म्हणाल्या, “माईंचे पहिले मानसपुत्र दीपकदादा गायकवाड हेच आज आमच्या सर्व लेकींसाठी आणि नातवंडांसाठी खरेखुरे हक्काचे माहेर आहेत. माईंच्या जाण्यानंतरही दादा आजही संपूर्ण कुटुंबाची कुटुंबप्रमुख म्हणून अत्यंत जबाबदारीने भूमिका पार पाडत आहेत. ते आम्हाला कधीच विसरत नाहीत, याचा आम्हा सर्व बहिणींना सार्थ अभिमान आहे. आमच्या लेकरांना त्यांच्या रूपाने एक अत्यंत प्रेमळ, कर्तृत्ववान आणि तितकाच निरागस मनाचा मामा लाभला आहे. प्रत्येकाची मनापासून काळजी घेणारा असा देवमाणूस आणि भाऊ आजच्या स्वार्थी युगात मिळणे निव्वळ अशक्य आहे.” हे सांगताना सर्व बहिणींचा कंठ दाटून आला, त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा आणि भावना पाहून भव्य मंडपातील उपस्थित शेकडो नागरिकांचे डोळेही पाणावले.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९२ साली स्थापन केलेल्या ‘ममता बाल सदन’ या संस्थेने आजपर्यंत तब्बल २२० अनाथ व गरजू मुलींचे कन्यादान करून त्यांची थाटामाटात लग्ने लावून दिली आहेत. या सर्व मुली आज आपल्या संसारात अत्यंत सुखाने नांदत असून माईंच्या या विशाल कुटुंबात आज २२० लेक-जावयांचा मोठा गोतावळा निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेनुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. याच परंपरेचे जतन करत, ज्या प्रेमाने व आदराने एखादा पिता आपल्या विवाहित लेकीला व जावयाला घरी बोलावून तिचा सन्मान करतो, त्याच संस्कृतीचे तंतोतंत पालन करत संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी ‘बापमाणूस’ म्हणून माईंच्या पश्चात ही परंपरा अखंड जिवंत ठेवली.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे (बिचवे), तामणदीप, निरंजन, ३३ अनारसे आणि तुळशीचे रोप अशा पारंपरिक आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या भेटवस्तू (वाण) देऊन आदराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदन (बालगृह) चे अध्यक्ष दीपक गायकवाड होते. यावेळी सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ, लामा फेरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला, शर्मिष्ठा जाधव, अनुश्री रिसवाडकर, शास्वती रिसवाडकर, बजरंग वाघ, चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. संजय रावळ, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. वांढेकर, डॉ. शेट्टी, अनिकेत खरे, पूजा खरे, शीतल सिनगारे, विनय सपकाळ, मनीष बोपटे आणि देविदास अरबट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सोहळ्यासाठी आर्थिक व सामाजिक पातळीवर मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला.

काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक घट्ट असतात. काही घरे विटा-मातीची नसतात, ती केवळ शुद्ध मायेने उभी राहतात. आणि काही माहेरं आई गेल्यानंतरही संपत नाहीत, ती दीपकदादांसारख्या माणसाच्या रूपाने कायम जिवंत राहतात. कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये आज असेच एक अनोखे आणि पवित्र भावविश्व उभे राहिले होते. माईंच्या जाण्यानंतरही त्यांचे हे कुटुंब विखुरले नाही, तर प्रेमाच्या धाग्यांनी अधिक घट्ट विणले गेले असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.

या अभूतपूर्व सोहळ्याचे कौतुक करण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कुंभारवळण येथे प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली. यामध्ये माजी आमदार अशोक टेकवडे, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सौ. राजवर्धिनीताई जगताप, पुणे जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, रश्मी कोलते, हरिभाऊ लोळे, शशिकला विजय कोलते, न्यायालयाचे संजय खामकर, पंचायत समिती सभापती प्रवीण जगताप, जितेंद्र कांबळे, पांडुरंग भोसले, आणि प्रसिद्ध उद्योजक अजित गोळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व लेक-जावयांना शुभाशीर्वाद दिले. याशिवाय ठाणे येथील ८० वर्षांच्या आजी रंजना गायकवाड यांनी सुद्धा या सोहळ्याला खास उपस्थित राहून संपूर्ण कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!