महाराष्ट्र अंनिसच्या राज्य बैठकीत अमरावती शाखेचा झेंडा; ‘लक्ष्यवेधी शाखा’ आणि प्रफुल्ल कुकडे यांना ‘लक्ष्यवेधी कार्यकर्ता’ पुरस्कार बहाल!
अमरावती/अहिल्यानगर, अविनाश वानखेडे ८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती/अहिल्यानगर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) विस्तारित राज्य बैठकीत अमरावती शाखेच्या गेल्या वर्षभरातील अत्यंत उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेऊन अमरावतीचा राज्यस्तरावर दुहेरी गौरव करण्यात आला आहे. अमरावती शाखेला “लक्ष्यवेधी शाखा २०२६” हा सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. तसेच अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष साथी प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांना त्यांच्या अत्यंत प्रभावी, संघटनात्मक, प्रबोधनात्मक आणि विज्ञाननिष्ठ कार्याबद्दल “लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६” या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दुहेरी यशामुळे अमरावती जिल्ह्यातील अंनिसच्या चळवळीला मोठे बळ लाभले असून कार्यकर्त्यांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे.
अहिल्यानगर येथील प्रसिद्ध बडी साजन मंगल कार्यालयात ६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तीन दिवशीय विस्तारित राज्य बैठकीच्या मुख्य सत्रात हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुण्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. सुभाष वारे यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. सुभाष लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गेल्या वर्षभरात अमरावती जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गतिमान प्रचार-प्रसार, संविधानातील पायाभूत मूल्यांची जपणूक, सामाजिक प्रबोधन, गावोगावी राबविण्यात आलेली प्रबोधन अभियाने, संघटन विस्तार, कार्यकर्ता प्रशिक्षण उपक्रम तसेच विविध स्थानिक सामाजिक प्रश्नांवरील यशस्वी हस्तक्षेपाची राज्यस्तरीय समितीने सखोल दखल घेतली. या सर्वांगीण कार्याचा गौरव म्हणून अमरावती शाखेला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
हा भव्य “लक्ष्यवेधी शाखा २०२६” पुरस्कार अमरावती शाखेच्या वतीने नरेंद्र धर्माळे, विजय डवरे, दिलीप लाडे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, दिगंबर मेश्राम, निखिल विल्हेकर, कुलदीप घरडे, प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे), विनोद चोंडके, कीर्तिका सयामे आणि महिला कार्यवाह (राज्य) गायत्री आडे यांनी स्वीकारला.
तसेच जिल्हा कार्याध्यक्ष साथी प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, वैज्ञानिक जाणीव जागृती, खंबीर संघटन उभारणी, स्थानिक सामाजिक प्रश्नांवर घेतलेली धाडसी भूमिका, महिला संघटन बळकट करण्याबाबतचे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण लोकसंपर्क यामधील अतुलनीय योगदानाबद्दल “लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६” या पुरस्काराने विशेषरित्या गौरविण्यात आले.
या राज्यस्तरीय बैठकीच्या पहिल्याच दिवशी अमरावती जिल्ह्याचा सविस्तर वार्षिक अहवाल जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांनी राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सादर केला. जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि विज्ञाननिष्ठ उपक्रमांचा अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी सर्वांसमोर मांडला. या उत्कृष्ट अहवालाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक करत अमरावती जिल्ह्याच्या शिस्तबद्ध कामाची विशेष नोंद घेतली.
कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण प्रास्ताविक ‘अनिप’चे कार्यकारी संपादक मा. उत्तम जोगदंड यांनी केले. उपस्थितांचा सविस्तर परिचय मा. प्रल्हाद मेस्त्री (सदस्य, संपादक मंडळ अंनिप) यांनी करून दिला, तर संपूर्ण सोहळ्याचे आभार प्रदर्शन मा. राजेंद्र फेंगडे (सदस्य, संपादक मंडळ अंनिप) यांनी मानले.
या सुवर्ण सोहळ्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष मा. माधव बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष मा. संजय बनसोडे होते. याप्रसंगी अमरावती शाखेच्या कार्याला सातत्याने दिशा व मार्गदर्शन करणारे मा. गजेंद्र सुरकार (राज्य प्रधान सचिव) आणि मा. विनायक सावळे (राज्य प्रधान सचिव) यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच मा. अजय भालकर (व्यवस्थापकीय संपादक, अनिप पत्रिका), मा. अशोक निकम (राज्यकार्यवाह, दस्तऐवज संकलन विभाग), प्रकाश कांबळे (राज्य सहकार्यवाह, वैज्ञानिक जाणीव विभाग) आणि सारिका डेहणकर (राज्य कार्यवाह, व्यसनप्रबोधन संघर्ष विभाग) या राज्य पदाधिकाऱ्यांसह मा. रजनी सुरकार, कल्पना सातव आणि राज्यातील सर्व विभागांतील कार्याध्यक्ष व प्रधान सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमरावती शाखेच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्रतिनिधींनी सांगितले की, “हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून अमरावती विभागातील सर्व सन्माननीय देणगीदार, वर्गणीदार, जाहिरातदार, सहकर्ते, स्थानिक पदाधिकारी, साथी सदस्य आणि आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व समविचारी संघटनांच्या सामूहिक संघर्षाचा व परिश्रमाचा विजय आहे. सर्वांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच हा संदेश अधिक प्रबळ बनला.” तसेच आगामी काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणखी व्यापक केला जाईल, तसेच येत्या काही महिन्यांत विशेष लेखन व वाचन कार्यशाळा आयोजित करून नवीन दमाचे लेखक व कार्यकर्ते तयार करण्याचे महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


