news
Home गुन्हेगारीउद्योग - व्यापार कामगार चळवळीची ज्योत तेवत ठेवण्याची गरज! – पुरुषोत्तम सदाफुले यांचा निर्धार!

कामगार चळवळीची ज्योत तेवत ठेवण्याची गरज! – पुरुषोत्तम सदाफुले यांचा निर्धार!

कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा सन्मान; 'श्रमप्रतिष्ठा' पुरस्कारांचे वितरण!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी: “महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिकीकरणामुळे मोठ्या संख्येने कामगारांनी काम केले आणि त्या काळात कामगार कायद्यांमुळे त्यांना अनेक लाभ मिळाले. मात्र, आज कामगारांची स्थिती आणि व्याख्या बदलत आहे. कामगार चळवळ क्षीण होत चालली असून या चळवळीची ज्योत पुन्हा एकदा तेवत ठेवण्याची गरज आहे,” असे स्पष्ट मत कामगार प्रशिक्षक पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात कष्टकरी कामगारांना ‘श्रमप्रतिष्ठा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान पुरुषोत्तम सदाफुले बोलत होते.

या कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, श्रमश्री बाजीराव सातपुते, कामगार नेते अरुण गराडे, कवी प्रभाकर वाघोले, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा, उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य किसन भोसले, सदस्य सलीम डांगे, लाला राठोड, सुनील भोसले, रुक्मिणी जाधव, माधुरी जलमुलवार, अश्विनी मालुसरे, मुमताज शेख, माया शेटे, वंदना चव्हाण, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बांधकाम कामगार लक्ष्मी पवार, रिक्षाचालक अविनाश पाटील, रंग कामगार व कलाकार गजानन बाजड, घरेलू कामगार सारिका मिसाळ, गटई टपरीधारक रोहिदास सातपुते आणि दगडखान कामगार स्वाती पवार यांना ‘श्रमप्रतिष्ठा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासह भारतातील आणि जगातील कामगार चळवळीचा महत्त्वपूर्ण इतिहास मांडला आणि या चळवळीचे महत्त्व विशद केले.

पुढे बोलताना सदाफुले म्हणाले की, कष्टकरी नेहमीच उपेक्षित राहिला आहे. अशा कष्टकऱ्यांना समोर आणून त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वाचे काम आहे. या कष्टकरी लोकांचा सन्मान केल्याने आम्ही स्वतःला कृतज्ञ मानतो. त्यांच्या सत्काराने आमचे हात पावन झाले आहेत. अशा कष्टकरी कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य पुढे घेऊन जात आहेत, असेही ते म्हणाले.

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगार कायदे टिकवून ठेवण्याची गरज व्यक्त केली. केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे रद्द करून नवीन चार श्रम संहिता आणल्या आहेत, त्याला विरोध करणे आवश्यक आहे, अन्यथा कामगार म्हणून आपले अस्तित्व धोक्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण साडेकर यांनी केले.

#कामगारदिन #महाराष्ट्रदिन #श्रमप्रतिष्ठापुरस्कार #कष्टकरी #कामगारचळवळ #पुरुषोत्तमसदाफुले #काशिनाथनखाते #नारायणमेघाजीलोखंडे #पिंपरी #महाराष्ट्र

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!