38

आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत स्त्रीशक्ती, नेतृत्व अन् मानसिक स्वास्थ्यावर मंथन; १ हजार उपासक-उपासिकांची उपस्थिती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड: बौद्ध धम्मातील प्रज्ञा, करुणा, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या मूल्यांना अधोरेखित करत महिला नेतृत्व, ऐतिहासिक योगदान, जागतिक भिक्खुणी परंपरा आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांवर चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. १७) आयोजित ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत’ प्रदीर्घ विचारमंथन करण्यात आले.
विस्डम इन मोशन, कॅटलिस्ट फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे व लक्ष्मीकांता माने यांनी या परिषदेचे संयोजन केले. या परिषदेला देश-विदेशातील बौद्ध भिक्खुणी, अभ्यासक, विचारवंत आणि सुमारे १ हजार उपासक-उपासिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध अँथमवरील नयनरम्य नृत्य सादरीकरणाने व व्हिएतनामी बौद्ध परंपरेतील पवित्र मंत्रोच्चाराने झाली. प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल थोरात यांनी बुद्धांचा आणि आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी आता ‘जेन झी’ (Gen Z) पिढीने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले. विशेष अतिथी आणि मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची व महाराष्ट्रात स्वतंत्र पाली विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या मूल्यांवर आधारित असणारा बुद्धिजम हा एक आदर्श जीवनमार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. – प्रा. मनोरी पी. सेनानायके
कोरियन भिक्खुणी संघाची जागतिक स्तरावरील प्रेरणादायी भूमिका मांडली. – भिक्खुणी महाकासा (व्हिडिओद्वारे)
युद्धातून शांततेकडे वाटचाल करताना व्हिएतनामी बौद्ध भिक्खुणींच्या योगदानाची माहिती दिली. – भिक्खुणी विसुद्धिपन्ना
शिलालेखांच्या आधारे बौद्ध महिलांच्या ऐतिहासिक प्रवासाचा वेध घेतला. – डॉ. योजना भगत
धम्माच्या तत्त्वज्ञानातून ताण, चिंता आणि मानसिक अस्वस्थतेवर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. – डॉ. नीलम ओसवाल
“माझ्यासाठी आंबेडकर हा केवळ विचार नसून ती माझी जीवनप्रणाली आहे,” असा आपला आंबेडकरवादी बनण्याचा प्रवास उलगडला. –चिन्मयी सुमीत (अभिनेत्री)
तसेच श्रीलंकेच्या भिक्खुणी उप्पलवना थेरी, तिबेटी भिक्खुणी द्रुपॉन ग्यालतेन सामतेन, भंते सुनीती भिक्खुणी व भिक्खुणी शाक्य धम्मदिना यांनी आपले अनुभव मांडले. ‘जयभीम २.०’ या सत्रात बीबीसी पत्रकार छाया कविरे, लेखिका मीनाक्षी इंगळे आणि डॉ. सांची कांबळे यांनी तरुणाईचा जयभीम नाऱ्याशी नव्याने जुळलेला धागा स्पष्ट केला.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ॲड. रंजना भोसले, वैशाली शेलार आणि डॉ. मनीषा कर्णे यांना ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मीराताई आंबेडकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या प्रसंगी समाजकल्याण विभाग पुण्याच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपआयुक्त अण्णा बोदडे, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे, सरपंच अर्चना खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी मार्गदर्शित ध्यानाच्या (Guided Meditation) सत्राने परिषदेची सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
