news
Home पिंपरी चिंचवड ‘इस्रो दौऱ्यासाठी देशभरातून १०० विद्यार्थ्यांची निवड; एएसएम महाविद्यालयात कलाम जयंतीनिमित्त भव्य सोहळा!’

‘इस्रो दौऱ्यासाठी देशभरातून १०० विद्यार्थ्यांची निवड; एएसएम महाविद्यालयात कलाम जयंतीनिमित्त भव्य सोहळा!’

पिंपरीतील एएसएम संकुलात 'कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६' स्पर्धा संपन्न; इस्रो दौऱ्यासाठी शंभर विद्यार्थ्यांची निवड | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वंचितांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत; ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ स्पर्धेत शेख दाऊद यांचे प्रतिपादन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून समाजातील वंचित, दुर्बल घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नवनवीन उपाय शोधावेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून सर्वांनी विकसित भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे,” असे आवाहन डॉ. कलाम यांचे नातपुतणे तथा ‘अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन’चे संस्थापक सदस्य शेख दाऊद यांनी केले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या (ASM) शैक्षणिक संकुलात आयोजित ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

‘हाऊस ऑफ कलाम’ (रामेश्वरम), ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन’ आणि ‘एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आदी राज्यांतील ९० शाळा व २५२ महाविद्यालयांतील १००० विद्यार्थी आणि २०० हून अधिक शिक्षकांनी यात सहभाग घेतला.
या स्पर्धेत हरित ऊर्जा, सौरऊर्जा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्यसेवा, रोबोटिक्स, संरक्षण, सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सामाजिक विकासाशी संबंधित १५० हून अधिक नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे सादरीकरण करण्यात आले. १०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी याचे परीक्षण केले. यातील विजेत्या १०० निवडक विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या’ (ISRO) अभ्यासात्मक दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

स्वागताध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे म्हणाले, “डॉ. कलाम यांचे विज्ञान हे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवन सुकर करण्याशी जोडलेले होते. नवनिर्मिती करताना मानवकल्याणाला प्राधान्य देणे हाच डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खरा वारसा आहे.” – डॉ. संदीप पाचपांडे (अध्यक्ष, ASM ग्रुप)

 

“भविष्यातील उद्योग हे मानव-केंद्रित आणि पर्यावरणपूरक असतील. भारतीय संशोधकांना नोबेल पुरस्कार मिळणे हीच डॉ. कलाम यांच्या स्वप्नाची खरी पूर्तता ठरेल.” – डॉ. अरविंद नातू (अध्यक्ष, आयसर कोलकाता नियामक मंडळ)

 

त्यांनी डॉ. कलाम यांच्यासोबत डीआरडीओमध्ये एकाच खोलीत काम करतानाचे अनुभव सांगताना, “कलाम सरांचे संपूर्ण लक्ष काम, संशोधन आणि नवकल्पनांवर असायचे,” अशा आठवणींना उजाळा दिला. – डॉ. दिलीप देशमुख (शास्त्रज्ञ, DRDO)

 

त्यांनी कायमस्वरूपी चुंबक विकसित करण्याच्या संशोधनासाठी डॉ. कलाम यांनी दिलेल्या प्रेरणेचा उल्लेख केला. – डॉ. ए. के. सिन्हा (ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ISRO)

 

त्यांनी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे कौतुक केले. – फजलू रेहमान (संस्थापक, स्टेम एक्सपर्ट)

 

या प्रसंगी ‘कलाम्स एंजल’ या चित्रपटाच्या टीझरचे अनावरण करण्यात आले. तसेच डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘माय स्टोरी : मदर’ आणि मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कलाम कॉमिक’ या पुस्तकांचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. यावेळी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. संजय गुप्ता यांचा शेख दाऊद यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास आयएएस अधिकारी हिरा लाल, डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देशमुख, डॉ. एस. डी. गोकुळ, प्रा. मुरलीधर रेड्डी, एएसएमचे डॉ. सुधाकर बोकफोडे, डॉ. व्ही. पी. पवार, डॉ. माथूर, डॉ. डी. डी. बाळसराफ, डॉ. विकास बरबटे, डॉ. मणीमाला पुरी व डॉ. ललित कानोरे उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन, संयोजन व आभार प्रदर्शन ‘अब्दुल कलाम फाउंडेशन’चे महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी आणि एएसएमचे जमीर मुल्ला यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!