50

पवना नदीवरील पाडलेला बंधारा पुन्हा बांधा; सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांची महापालिका आयुक्तांकडे आग्रही मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म आणि पिंपळे सौदागर परिसरातील पवना नदीवर पूर्वी अस्तित्वात असलेला बंधारा महापालिका प्रशासनाने तातडीने पुन्हा बांधावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी केली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले असून, काही वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे संपूर्ण परिसराची अवस्था गटारासारखी झाली असून पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अमोल उबाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मच्छरांच्या उपद्रवाचे सकृतदर्शनी कारण पुढे करत, हा बंधारा पाडण्यासाठी डेअरी फार्म प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर हा बंधारा पाडण्यात आला. मात्र, तेव्हापासून नदीपात्रात पाणी साठणे पूर्णपणे बंद झाले असून, या महत्त्वपूर्ण जलस्रोताची अवस्था एका उघड्या गटारासारखी झाली आहे.
हा बंधारा उभा असताना पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आणि चिंचवड या संपूर्ण परिसरातील पवना नदी वर्षभर पाण्याने तुडुंब भरलेली असायची. डेअरी फार्ममधील जनावरांसह परिसरातील इतर मुक्या प्राण्यांना या पाण्याचा मोठा आधार होता. तसेच, भूजलाची पातळी उच्च राहिल्याने आजूबाजूच्या गावातील विहिरी आणि बोअरवेलना वर्षभर भरपूर पाणी असायचे. मात्र, बंधारा नष्ट केल्यापासून भूजल पातळी वेगाने खालावली असून नदीपात्रात केवळ दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

काही स्वार्थी बांधकाम व्यावसायिक (बिल्डर लॉबी) पूररेषा (Flood Line) मर्यादित ठेवण्याच्या कारणावरून या बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीला अप्रत्यक्ष विरोध करत आहेत. पूररेषा कमी झाल्यास बांधकामासाठी अधिक जागा उपलब्ध होईल, या व्यावसायिक फायद्यासाठी आणि दबावामुळे या महत्त्वाच्या सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप अमोल उबाळे यांनी केला आहे.
राज्यकर्ते, राजकारणी आणि बिल्डर लॉबीच्या संगनमतामुळेच हे काम रखडले असून, जनहित आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देत प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या बंधाऱ्याची त्वरित पुनर्बांधणी करावी, अशी जोरदार मागणी पिंपरी-चिंचवडकर नागरिकांकडून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

