23

ग्रंथांचा आधार घेऊन कौशल्य सिद्ध करा, ग्रंथ विश्वासार्हता देतात: डॉ. प्रा. मीनल ओक
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “सध्याचा काळ हा केवळ पदवीचा नसून कौशल्य प्राप्त असणाऱ्या व्यक्तींचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन व संवाद कौशल्य विकसित करून आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे. एमबीए आणि पीएचडीसारखे उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करावी लागते. यासाठी पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा गुगलवर अवलंबून न राहता ग्रंथालयात जाऊन अधिकृत संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा. ग्रंथ माणसाला विश्वासार्हता देतात आणि शब्दसंग्रह समृद्ध करतात,” असे प्रतिपादन आयएमसीसीच्या प्रा. डॉ. मीनल ओक यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करत होत्या.
डॉ. मीनल ओक पुढे म्हणाल्या, “संवाद साधताना तांत्रिक भाषा आणि पारिभाषिक शब्दांचा योग्य वापर केल्यास आत्मविश्वासाने सादरीकरण करता येते. विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतः मूळ लेखन करण्यावर भर दिला पाहिजे. अभ्यासाच्या संदर्भासाठी एआय (AI) आणि विविध अॅप्सचा वापर केवळ सहाय्यक म्हणून करावा; परंतु त्यातील मजकूर जसाच्या तसा कॉपी-पेस्ट करू नये, कारण ते वाङ्मयचौर्य (Plagiarism) ठरते.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन शांततेत ग्रंथवाचन करत डॉ. कलाम यांच्या विचारांचे स्मरण केले.

या सोहळ्यास एसबीपीआयएमच्या संचालक व प्राचार्य डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, आर अँड डी प्रमुख डॉ. भूषण परदेशी, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. स्वप्नील सोनकांबळे आणि डॉ. अमरीश पद्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल स्वाती सातपुते व सहाय्यक ग्रंथपाल अनघा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आर्या सरदेशपांडे व ओम माळी यांनी केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

